खानापूरपासून करंबळ रोडपर्यंतच्या रस्त्याची मोठमोठे खड्डे पडून पार दुर्दशा झाली असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी सदर रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी, अशी जोरदार मागणी वाहनचालकातून केली जात आहे.
खानापूरपासून करंबळपर्यंतच्या मुख्य रस्त्याची वाताहात झाली आहे. सदर रस्त्यावर तीन -चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्या ठिकाणचा रस्ताच इतिहासजमा झाला झाला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले असून खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. रस्त्यावर फूट -दीड फूट खोलीचे खड्डे पडले असल्यामुळे कांही ठिकाणी एका बाजूची वाहने थांबून दुसऱ्या बाजूच्या वाहनांना मार्ग मोकळा करून द्यावा लागत आहे. वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज घेऊन एका बाजूने काळजीपूर्वक रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सदर रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता या ठिकाणी नवख्या वाहनचालकांकडून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. खानापूरच्या आमदारांची या रस्त्यावरून नेहमी ये-जा असते, मात्र त्यांचेही या रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष गेले नसल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
तरी त्यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन खानापूरपासून करंबळपर्यंतच्या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करून वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.