पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडीनजीक भरधाव कारगाडीने दुचाकीला मागून धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला.
अनिल आत्माराम यादव (वय 42, रा. सौदलगा, ता. निपाणी) असे अपघातात ठार झालेल्याचे नांव आहे. यादव हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून एमआयडिसीतून लक्ष्मी टेकडीकडे जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने (केए 51 8923) त्यांना जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या यादव यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालक सूर्यकांत श्रीकांत चौधरी (रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हिरेकुडी (ता. चिकोडी) येथे भरधाव कार आणि दुचाकी यांची समोरासमोर टक्कर झाल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. जिनेन्द्र रायगौडा पाटील (वय 41) असे मृताचे नांव आहे.
जिनेन्द्र आपल्या दुचाकीवरून (केए 22 ईव्ही 6551) नागराळहून नेजच्या दिशेने घराकडे जात असताना चिक्कोडी आगाराची बस (क्र. केए 42 एफ 681) आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जिनेन्द्र जागीच ठार झाला. या प्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.