देशभरातील शेतकर्यांनी आज सोमवारी छेडलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनास बेळगावात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शहरातील चन्नम्मा सर्कल येथे विविध शेतकरी संघटना आणि कर्नाटक रक्षण वेदिकेच्यातर्फे आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने आज सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली असून देशभरातील सर्व शेतकरी संकटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. त्यानुसार बेळगावातील विविध शेतकरी संघटना आणि कर्नाटक रक्षण वेदिकेच्यातर्फे कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी अन्यायी कृषी कायदे मागे घ्यावेत यासह केंद्र सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात येत होत्या.
नव्या कृषी कायद्याद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लागत असून या कायद्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होणार आहे. तेंव्हा सरकारने हे कृषी कायदे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
चन्नम्मा सर्कल येथील शेतकर्यांच्या आंदोलनाला रक्षण वेदिकेने पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनामुळे चन्नम्मा सर्कल येथील रहदारीस कांही काळ अडथळा निर्माण झाला होता. परिणामी पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना रस्ता मोकळा करण्याची विनंती केली.
तथापि विनंती धुडकावून आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून कांही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि रहदारी सुरळीत केली. एकंदर कृषी कायद्यांच्या विरोधातील ‘भारत बंद’ला आज बेळगावातील नागरिकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.