Wednesday, December 11, 2024

/

28 पासून श्री यल्लमा देवस्थान देखील होणार खुले

 belgaum

कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थान येत्या मंगळवार दि. 28 सप्टेंबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार प्रमुख देवस्थानांसह आता श्री यल्लमा देवस्थान खुले होणार असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा देवस्थान प्रादुर्भाव निवळल्यामुळे पूर्ववत भक्तांसाठी कांही अटींवर खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर देवस्थान येत्या 28 सप्टेंबरपासून भाविकांसाठी खुले करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. तथापि पुढील आदेश येईपर्यंत या देवस्थानात विशेष उत्सव अथवा यात्रेचे आयोजन करण्यावर निर्बंध असणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्री यल्लमा देवस्थानास भेट देणाऱ्या भाविकांना कांही अटींचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. देवदर्शनास येणाऱ्या भक्तांना फेसमास्कसह सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. देवस्थानात भक्तांसाठी थर्मल स्कॅनिंग आणि सॅनीटायझरची सोय करणे अनिवार्य आहे.Renuka devi

थर्मल स्कॅनिंगद्वारे प्रत्येक भक्ताचा शारीरिक उष्मांक तपासला जावा. उष्मांक सर्वसामान्यपेक्षा जास्त असेल तर संबंधिताला देवस्थानात प्रवेश दिला जाऊ नये. एकंदर कोरोना संदर्भातील केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन केले जावे. सध्या परिस्थिती नुसार देवस्थाने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास पुन्हा मंदिरे बंद करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे कोरोना मार्गदर्शक सूचीचे उल्लंघन झालेले आढळल्यास देवस्थान खुले ठेवण्यासाठी दिलेली परवानगी रद्द केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे देवस्थान म्हणून सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा देवस्थान सुप्रसिद्ध आहे. कर्नाटकसह महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचा या देवस्थानाकडे ओढा असतो. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षापासून हे देवस्थान बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता बेळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात चार प्रमुख देवस्थानं खुली करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर 28 सप्टेंबरपासून श्री यल्लमा देवस्थान देखील भाविकांसाठी खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रायबाग तालुक्यातील चिंचणी येथील श्री मायाक्का देवी देवस्थान, कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील श्री मल्लय्य देवस्थान, हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री येथील श्री होळेम्मा देवी देवस्थान आणि सौंदत्ती तालुक्यातील जोगुळभावी येथील श्री सत्यमा देवी देवस्थान आज बुधवार 22 सप्टेंबरपासून भाविकांसाठी खुले करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. याबरोबरच लवकरच सौंदत्ती श्री यल्लमा देवस्थान खुले होणार असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.