दरवर्षीप्रमाणे अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी गणेशोत्सवानिमित्त यावेळीही फिरत्या निर्माल्य कुंडाचा उपक्रम सुरु केला असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
माजी नगरसेवक विनायक गुंजकर हे गेल्या 8 वर्षापासून गणेशोत्सव काळात फिरत्या निर्माल्य कुंडाचा उपक्रम राबवत आहेत. यंदाच्या या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी विनायक गुंजटकर यांच्या हस्ते फिरते निर्माल्य कुंड असणाऱ्या वाहनाचे पूजन करण्यात आले अभिषेक कुट्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. याप्रसंगी फाटक भडजी, अर्चना पाटील, शोभा पाटील, लक्ष्मी गुंजटकर यमुना धुडूम, विश्वनाथ पवार, प्रदीप कुट्रे आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात घरोघरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून पूजाअर्चा केली जाते. त्यामुळे जमा होणारे बाप्पा समोरील निर्माल्य सार्वजनिक ठिकाणी झाडाखाली, कचर्याच्या ढिगार्यात किंवा कचरा कुंडात फेकले जात होते. देवासमोरील या निर्माल्याचे पावित्र्य जपले जावे यासाठी विनायक गुंजटकर यांनी 8 वर्षांपूर्वी स्वखर्चाने अनगोळ परिसरासाठी गणेशोत्सव काळात फिरत्या निर्माल्य कुंडाची सोय केली आहे.
यासाठी छोट्या अशोक लेलँड वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे फिरते निर्माल्य कुंडाचे वाहन अनगोळातील जवळपास सर्व प्रभागांमधील घराघरातील निर्माल्य यांचे संकलन करण्याचे काम करते. यासाठी वाहनावर दोन गणेशभक्तांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.
पूर्वी घराघरातून संकलित केलेले निर्माल्य शेतामध्ये खत म्हणून वापरले जात होते. मात्र अलीकडे गोळा केलेले निर्माल्य कपलेश्वर किंवा जक्कीरहोंड येथील प्रमुख निर्माल्य कुंडात जमा केले जाते.
दरम्यान माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांचा आदर्श घेऊन शहरातील अन्य प्रभागांमध्ये देखील तेथील लोकप्रतिनिधीनी फिरत्या निर्माल्य कुंडाचा उपक्रम राबविल्यास घरोघरच्या गणेशभक्तांची चांगली सोय होणार असून निर्माल्याचे पावित्र्यही जपली जाईल हे निश्चित.