कोरोनामुळे सण समारंभ आणि उत्सवाच्या सादरीकरणावर अनेक निर्बंध निर्माण झाले. यावर्षी बेळगाव शहरात पाच दिवसा ऐवजी दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी स्थानिक जिल्हा प्रशासनाने दिली असली तरी विसर्जनाच्या मिरवणुकीवर अनेक निर्बंध घालावे लागले आहेत.
यासंदर्भात बेळगाव शहरातील पोलिस उपायुक्तांनी गणेशोत्सव महामंडळाची तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन अनेक सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचे पालन न केल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोरोना चा फैलाव होऊ नये म्हणून ही काळजी घ्यावी लागत आहे. कोरोना जास्तीत जास्त वाढल्यास त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार असल्यामुळे यासाठी विसर्जनाच्या दिवशी गर्दी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने दिली आहे.केवळ 10 कार्यकर्त्यांना गणेश विसर्जन साठी परवानगी देण्यात आली आहे.
गणेश मूर्ती समोर विसर्जन काळात गर्दी केल्यास के ए टी अंतर्गत गुन्हा दाखल करणार असा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाचे नियम पाळून विसर्जन करा, अशी सूचना मार्केट ए सी पी कार्यालयात महामंडळांची बैठक घेऊन करण्यात आली आहे.
बेळगाव शहर व शहापूर भागांतील मूर्तीचे कपिलेश्वर तलावात विसर्जनतर वडगांव टिळकवाडी अनगोळ या उपनगरातील त्या त्या उपनगरात निर्माण करण्यात आलेल्या तलावात आणि जक्कीनहोंड मध्ये विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.रात्री 8 च्या आत विसर्जन करा अशी सूचनाही देण्यात आली असून या सूचनांचे पालन न करणाऱ्या मंडळांना कारवाईचा फटका बसणार आहे.