येळ्ळूर रस्त्यावर एकमेकांना मागे टाकण्यासाठी बेभान बस चालवल्याबद्दल जाब विचारणाऱ्या नागरिकांना परिवहन मंडळाच्या बस चालकांनी उद्दाम उत्तरे देत बससेवा बंद करण्याची धमकी दिल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
आज येळ्ळूर रोडवर वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या दोन बसगाड्यांमध्ये तू पुढे काय मी, अशी रेस लागली होती. ही बाब येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्य परशराम परीट व दयानंद उघाडे याच्या निदर्शनास येताच त्यांनी बसेस थांबून दोन्ही बस चालकांना जाब विचारला. त्यावेळी बस चालक दादागिरीची भाषा करायला लागले.
आम्हाला मराठी कळत नाही कन्नडमध्ये बोला नाही तर तुमच्यावर पोलीस केस घालू ,अशी धमकी त्यांनी दिली. तसेच येळ्ळूरची बससेवा कायमची बंद करेन अशी दादागिरी केली. बेभान बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बस चालकांच्या या अरेरावीमुळे घटनास्थळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.
मात्र सदर प्रकारामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की मराठी भाषिकांची दडपशाही सुरूच आहे. एकंदर प्रकाराबद्दल उपस्थित लोकांसह ग्रा. पं. सदस्य दयानंद उघाडे आणि परशराम परीट यांनी दोन्ही बसचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.