बेळगाव ते खानापूर पर्यंतच्या महामार्गावर मराठी भाषेतूनही फलक लावावेत अशी सूचना भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला करण्यात आली आहे.
बेळगाव ते खानापूर महामार्गावर इतर भाषेबरोबरच मराठी भाषेत लावण्यात यावेत अन्यथा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे स्वतःहून फलक लावण्यासाठी पुढाकार घेईल असा इशारा देण्यात आला होता.
तसेच काही दिवसांपूर्वी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या भाषिक अल्पसंख्याक आयोग दक्षिण पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त एस शिवकुमार याना निवेदन देण्यात आले होते. याची
दखल घेत सहायक आयुक्तांनी महामार्ग प्राधिकरणला पत्र पाठवून इतर भाषांबरोबरच मराठी भाषेतून फलक लावण्याची सूचना केली आहे.
खानापूर तालुका युवा समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक एस.एम.नाईक यांनाही निवेदन देण्यात आले होते. यावेळी भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने ज्या भागात एखाद्या भाषेचे 15 टक्क्यांहून अधिक लोक रहात असतील तर त्यांना त्यांच्या भाषेतून माहिती देणे गरजेचे आहे अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. खानापूर व बेळगाव तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या 80 टक्क्यांहून अधिक आहे. अशा परिस्थीतीत महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव ते खानापूर व पुढील परिसरात सर्व फलक मराठी भाषेत लावावेत अन्यथा मराठी भाषिक स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा देण्यात आला होता.
भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सुचनेनुसार खानापूर ते पिरणवाडी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर तातडीने मराठीतून फलक लावणे गरजेचे असून फक्त कन्नड व इंग्रजी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत मात्र या भागातील लोकांना कन्नड भाषा समजत नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याची दखल घेऊन तातडीने तिन्ही भाषेतील फलक लावावेत आणि मराठी भाषिकांना होणारी अडचण दूर करणे आवश्यक आहे.