बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या खानापूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बेळगावला ने -आण करण्यासाठी 23 बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
बेळगाव महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मनपा निवडणुकीसाठी उद्या गुरुवार दि. 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता खानापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बसेस उपलब्ध असणार आहेत. खानापूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण 680 जणांना बेळगाव महापालिका निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या सर्वांना 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता खानापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उपस्थित राहावे लागणार असून तेथून त्यांना बेळगाव शहरातील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या आवारात आणून सोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा बसमधूनच खानापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सोडले जाणार आहे. तिथून ते आपापल्या घरी जाऊ शकतात.
खानापूर तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना महापालिका निवडणूक विभागाला दिली होती. त्यानुसार निवडणूक विभागाने संबंधितांसाठी बसची सोय करून दिली आहे. तरी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्धारित वेळेत खानापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.