बेळगावच्या भाजप नेत्या व नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी आज बेंगलोर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरवस्थेकडे तसेच वीज, रस्ते, गटारी आदी मूलभूत नागरी समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.
बेंगलोर येथे सुरु असलेल्या अधिवेशनाचे कामकाज आज समाप्त झाल्यानंतर बेळगावच्या भाजप नेत्या आणि नियती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. तसेच खानापूर तालुक्यातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था, तालुक्यातील गटारी, रस्ते आणि विजेच्या वीजपुरवठ्याची समस्या आदिंसंदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करून माहिती दिली.
खानापूर तालुका हा बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे या तालुक्याची लोकसंख्या आणि एकूण मतदान सुमारे 35 हजार इतके आहे. मात्र या ठिकाणी फक्त पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ती व्यवस्थित कार्यरत नाहीत. याव्यतिरिक्त तालुक्यातील नागरिकांना वीज, गटार, रस्ते आदी मूलभूत नागरी सुविधांची अवस्था देखील दयनीय आहे.
तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खानापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारावा आणि या ठिकाणच्या नागरी समस्या दूर कराव्यात, अशी विनंती डॉ. सोनाली सरनोबत यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना केली. मुख्यमंत्र्यांनी डॉ सोनाली सरनोबत यांच्या विनंतीला मान देऊन खानापूर तालुक्यातील आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्याबरोबरच अन्य समस्या लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री याप्रसंगी डॉ. सरनोबत यांच्यासोबत पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर समस्यांबाबत डाॅ. सोनाली सरनोबत यांनी स्थानिक नेते विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी आणि खासदार अनंत कुमार हेगडे यांच्याकडेही पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या सर्व नेत्यांनीही खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.