कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई उद्यापासून बेळगावच्या दौऱ्यावर येत असून सावगाव रोडवरील अंगडी इन्स्टिट्यूटमधील दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. परिणामी सावगाव रोडची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जात असून खड्डे बुजवण्यात येत असल्यामुळे या रस्त्याचे जणू भाग्य उजळले आहे.
अंगडी इन्स्टिट्यूटकडे जाणाऱ्या सावगाव रोड या रस्त्याचे स्मार्ट सिटी अंतर्गत कांही प्रमाणात कॉंक्रिटीकरण करण्यात आले असले तरी त्या पुढील रस्ता डांबरी आहे. काँक्रिटीकरण झालेला रस्ता वगळता डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या या खड्ड्यांबाबत तक्रार करून देखील अद्यापपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले होते. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मात्र तरीदेखील खड्डे बुजवण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रस्त्यावरून वाट शोधताना वाहनचालकांची दमछाक होण्याबरोबरच वाहने नादुरुस्त होत होती.
सदर रस्त्यावर रात्री खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या ही किरकोळ घटना घडल्या आहेत. मात्र आता रविवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या मार्गावरुन जाणार असल्याने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
तसेच काँग्रेस रोडवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सावगाव रस्त्याचे भाग्य उजळले असल्याचे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यामध्ये बोलले जात आहे.