Friday, November 15, 2024

/

भीमगड अभयारण्यातील दुर्गम गावांना “ऑपरेशन मदत” द्वारे मदतीचा हात …

 belgaum

भीमगड अभयारण्याचे कर्मचारी, बेळगाव वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, बेळगाम बायसन जिपर्स ग्रुप, शालिनी फाउंडेशन, HERF रेस्क्यू टीम, ग्रामस्थ, गुजरात भवन आणि खानापूर आणि बेळगावच्या सर्व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन मदत” अंतर्गत ही ऐतिहासिक मोहीम राबविण्यात आली.

अभयारण्यात अचानक वाऱ्यासह पडणारा पाऊस. मधेच येणारा धुक्यात हरवलेला मंत्रमुग्ध पठारावरील प्रदेश, ओरबडणाऱ्या काटेरी वेलींसोबत वाटेवरील गर्द जंगल, आणि सोबत अतिशय खडबडीत, निसरडे खडकाळ रस्ते, उंच डोंगर व खोल उताराच्या दऱ्या, रक्तपिपासू जळवा आणि सरपटणारे विषारी प्राणी, दलदलीचा आणि घनदाट जंगलाचा निर्मनुष्य प्रदेश, अभयारण्यामुळे जंगलात असणारा हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त वावर, त्यातच भिमगड अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प असल्याने न मिळणारी परवानगी, अशा विविध कारणांमुळे या गावांत पोहचण्याचे एक स्वप्नच होते.

आम्ही भेट दिलेली ही 5 गावे जगापासून जवळजवळ पूर्णतः अलिप्तच होती, स्वच्छ निसर्ग, जिथे अजूनही वीज पोहचलेली नाही, गावकऱ्यांकडे खायला पुरेसे पौष्टिक अन्न नाही, कसायला पुरेशी शेतजमीन नाही आणि परिधान करण्यासाठी योग्य कपडे पण नाहीत. येथील लोकांना जर रेशन हवे असल्यास त्यांना जंगलातून व वाटेवरील नद्या नाले पार करून जवळपास 15/18 km अंतरावरील नजिकच्या नेरसा या गावी चालत जावे लागते. तशातच आरोग्य विभागाच्या योजना येथेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत.

भिमगड अभयारण्य परिसर व पश्चिम घाटातील ट्रेकिंग आणि दुर्गम ग्रामीण भागात नरेगाच्या माध्यमातून बरेचवेळा फिरल्याने राहुल पाटील व त्यांच्या काही सहकाऱ्यांना हा भाग परिचित आहे. अभयारण्याच्या अंतर्गत भागातील या दुर्गम गावच्या ग्रामस्थांची पावसाळ्याच्या 4 महिन्यात होणारी दुर्दशा ओळखून त्यांनी या गावकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. तळेवाडी, गवाळी, पाष्टोली, कोंगळा आणि सायचामाळ (धनगरवाडा) या दुर्गम गावातील कुटुंबांची माहिती काही गावकरी, शाळेचे शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी, परिसरातील वन विभागाचे कर्मचारी व विविध क्षेत्रातील आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने माहिती गोळा केली, आणि काही दिवसांपूर्वीच आपल्या रेस्क्यू टीमसह खानापूर तालुक्यातील नेरसा व अशोकनगर मधील शाळेला भेट दिली आणि मुलांना चॉकबोर्ड, शैक्षणिक साहित्य, लहान मुलामुलींचे कपडे, स्वेटर, शाली, ब्लॅंकेटस्, बेडशीट, बिस्किटे आणि मेणबत्त्या वाटप केले नंतर जंगलातील अंतर्गत रस्त्यांची तपासणी करण्यासाठी दोन रेस्क्यू जीपसह नदीपात्रातून पलीकडे जाऊन पाहणीसुद्धा केली.

Bhimgad
भिमगड अभयारण्याच्या या गावातील महिला आणि मुलांच्या आरोग्याची स्थिती खूपच वाईट आहे. गावकऱ्यांना शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत, गावाबाहेर नोकरीला आणि कामावर जाणारे, हायस्कूल/महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक शाळेत शिकवणारे शालेय शिक्षक, आजारी लोक, स्त्रिया, मुले आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात जाण्यासाठी. म्हादई व भांडूरा या दोन नद्यांवरील आणि ओढ्यावरील लाकडी साकव पार करून जवळच्या गावी (नेरसा) येण्याशिवाय पर्यायच नाही, ही जीवघेणी कसरत यांना रोज करावी लागते, व नंतर खानापूर गाठावे लागते. ही माहिती
आपले ज्येष्ठ सहकारी भूपेंद्र पटेल यांना राहुलनी दिली आणि त्यांच्या सल्ल्याने व लायन्स क्लबच्या मदतीने गुजरात भवन येथे (एका कुटुंबाला सुमारे 15 दिवस पुरेसे) 200 रेशन किट तयार केले. सर्व वरिष्ठांशी भेटून आपल्या ‘ऑपरेशन मदत’ संदर्भात प्रशासनाशी चर्चा करून परवानगी मिळवली. आणि दुर्गम भागातील योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत हे जीवनावश्यक अन्नधान्य (रेशन) किट पोहोचण्यासाठी आपल्या
पं (BISON GROUP & HERF Rescue Team) सहकाऱ्यांची मदत घेतली. तळेवाडी, गवाळी, पाष्टोली, कोंगळा आणि सायचामाळ (धनगरवाडा) वरील सुमारे 200 गरजू कुटुंबांना अन्नधान्य (रेशन) किट वितरीत करण्यात आले, गावातील मुलांना चॉकलेट्स ही वाटले.
गवाळी गावातील ग्रामस्थ आणि शाळेच्या शिक्षकांनी दुपारी शाळेच्या आवारातच केळीच्या पानांवर गावरान चवीचा भात, आमटी आणि भाजी, अशा लज्जतदार जेवणाने सर्वांना वेगळीच तृप्तता मिळाली. म्हादई नदीवरील पुरामुळे वाहून गेलेला लोखंडी फूटब्रिज पाहताना, नदीच्या काठावरील जळवांनी उपस्थितांना आपलीही हजेरी दर्शवली. थोड्याच अंतरावर शेजारी गवाळी गावातील 12/15 तरुणांनी, भरपावसात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीवर फक्त 10 दिवसात बांधलेला लाकडी साकव पाहून ऊर भरून आला, उपस्थितांनी त्यांचे कौतुकही केले.

जंगलातील वाटेवरच्या रस्त्यावर वाहणाऱ्या ओढ्यातून चिखल आणि पाणी उडवणाऱ्या BISON च्या निर्दयी जीपची मजा, तसेच कधी चिखलात अडकलेली जीप, कधी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने, कधी उतारामुळे जवळजवळ उलटणारी गाडी सरळ करणारे ड्रायव्हर्स, अशा कित्येक बिकट प्रसंगात सर्वांची काळजी घेऊन, सर्वांना जंगलातून सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना त्यांच्या घरी परत पाठवणारे, बायसन जिपर्स ग्रुपचे राजू होसमनी, डाॅ संतोष पत्तार, कार्तिक शाह, राहुल पाटील, रियाज मकानदार, महंतेश वस्त्रद, संजय पावसकर, श्रीराज महानगावकर, व्हिक्टर फ्रान्सिस, राजू ड्रायव्हर, अनुराग अनगोळ, निरज शाह या अनुभवी ड्रायव्हर्स, मेकॅनिक. आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांमुळे ही मोहीम खरोखरच अविस्मरणीय झाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.