पट्टणकुडी गावातील सर्व्हे नं. 93 मधील नियोजीत कचरा डेपो नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणार असल्यामुळे तो सर्व्हे नं. 93 ऐवजी 175 मध्ये सुरू करावा, अशी मागणी पट्टणकुडी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कचरा डेपो संदर्भातील उपरोक्त मागणीचे निवेदन पट्टणकुडी गावकऱ्यांनी आज सोमवारी जिल्हाधिकार्यांना सादर केले. पट्टणकुडी येथील सर्वे नं. 93 मध्ये कचरा डेपो सुरू करण्याची योजना आखण्यात आली असून ग्रामपंचायतीमध्ये तसा ठरावही संमत करण्यात आला आहे. तथापि कचरा डेपोच्या या जागे नजीकच सरकारकडून अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी घरे मंजूर झाली आहेत.
त्यामुळे याठिकाणी कचरा डेपो सुरू झाल्यास अस्वच्छता व दुर्गंधीमुळे वातावरण दूषित होणार आहे शिवाय अस्वच्छतेमुळे डास व माशांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. परिणामी भविष्यात नजीकच्या नागरी अनुसूचित जाती-जमातीच्या वसाहतीतील लोकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
याचा गांभीर्याने विचार केला जावा. गावातील सर्व्हे नं. 175 या खुल्या जागेनजीक कोणतीही नागरी वसाहत नाही. तेंव्हा 93 ऐवजी 175 सर्व्हे नंबरमध्ये कचरा डेपो सुरू केला जावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी पट्टणकुडी येथील बरेच स्त्री -पुरुष नागरिक उपस्थित होते