जनतेला भेडसावणारे नियम, प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी जनस्नेही पोलीस उपक्रमांतर्गत शहरातील पोलीस अधिकाऱ्यांनी रोज सायंकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत आपापल्या पोलिस स्थानक कार्यक्षेत्रात पदभ्रमंती करण्यास सुरुवात केली आहे. स्वतः पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल सायंकाळी शहरातील मार्गांवर फिरून नागरिक आणि दुकानदारांच्या भेटी घेऊन विचारपूस करण्यासह त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
पोलिसांच्या कामात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असते. अलीकडे पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी वाढली आहे. अधिकारी आपले कार्यालय सोडून बाहेर पडत नाहीत असा आरोप आहे. अनेक जण तर फोन देखील उचलत नाहीत. त्याचप्रमाणे पोलीस स्थानक रियल इस्टेट एजंटचे अड्डे बनू लागल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांच्या मनात नाराजीचा सूर आहे.
आता नागरिकांचे सहकार्य मिळवण्यासाठी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात पदभ्रमंती करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील विविध पोलिस स्थानकाच्या धिकार्यांनी आपापल्या भागात पायपीट करून नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
स्वतः पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल सायंकाळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत शहरात फेरफटका मारून नागरिक आणि दुकानदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी दुकाने, उपहारगृहे, कॅन्टीन्स यांची पाहणी करून संबंधितांच्या कांही समस्या आहेत का ते जाणून घेतले. तसेच त्याला आवश्यक सूचना दिल्या. ज्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत त्यांना ते बसवण्यास सांगण्यात आले.
उपाहारगृहे व कॅन्टीनमध्ये मद्यपान वगैरे चालत नाही ना? याची चौकशी केली. सार्वजनिक ठिकाणी कोणतेही अवैध गैरप्रकार करू नका आणि आसपास असे प्रकार आढळून आल्यास त्वरित पोलिसांना त्याबाबत माहिती द्या, अशी सूचना पोलीस उपायुक्त डॉ. आमटे सर्वांना देताना दिसत होते.