बेळगाव शहरासाठी एकच अतिक्रमण निर्मूलन पथक नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून येत्या 1 ऑक्टोबरपासून हे पथक शहरात कार्यरत होणार आहे.
बेळगाव महापालिकेत 2019 पर्यंत एकच अतिक्रमण निर्मूलन पथक होते. अर्जुन देमट्टी यांच्याकडे अनेक वर्षे या पथकाची जबाबदारी होती. ते निवृत्त झाल्यानंतर निरीक्षक पदासाठी आरोग्य विभागातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू होता. त्यावर तोडगा म्हणून पथकाची विभागणी करून शहराच्या उत्तर व दक्षिण विभागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते.
गेली दोन वर्षे दोन्ही पथकांचे कामकाज स्वतंत्रपणे सुरू होते. परंतु त्यांच्या कामात सुसूत्रता नसल्यामुळे पुन्हा एकच अतिक्रमण निर्मूलन पथक स्थापन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाला घ्यावा लागला. गेल्या सोमवारी याबाबतची माहिती पथकातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर अतिक्रमण निर्मूलन पथकाची जबाबदारी मारुती हंचिनमणी यांच्याकडे सोपविण्यात आली असून निरीक्षक म्हणून त्यांना काम करावे लागणार आहे.
शहरातील अतिक्रमण हटविणे मोकाट जनावरे पकडणे आदी कामे अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या करावी लागतात. 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात तसेच लाॅक डाऊन काळात अतिक्रमण निर्मूलन पथकाच्याने उल्लेखनीय काम केले होते. शहरातील निराश्रितांना अल्पोपहार व भोजन देण्याची जबाबदारी पार पडली होती.
मोकाट जनावरे पकडण्याच्या मोहिमेत पथकावर तीन वेळा हल्लाही झाला आहे. अतिक्रमणे हटविताना अनेकदा लोकांशीही वाद झाला आहे. तथापि महापालिकेचे हे पथक सातत्याने कार्यरत आहे. आता पथकातील सर्व कर्मचारी पुन्हा एकत्र आल्याने भविष्यात पथकाकडून जोरदार मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.