Saturday, December 28, 2024

/

उमेदवारांकडून महाआरती? : आमिषासाठी प्रयत्न?

 belgaum

बेळगाव महापालिका निवडणुकीचे मतदान तोंडावर आले असताना शहराच्या मध्यवर्ती भागात कांही उमेदवारांकडून महाआरतीसह मतदारांना विविध आमिष दाखविण्याचा घाट रचला जात असल्याचे बोलले जात असून या प्रकाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कांही प्रभागांमधील उमेदवार मनपा निवडणुकीत आपल्याला यश मिळावे, त्याचप्रमाणे मतदारांना आकर्षित करता यावे यासाठी महाआरतीचे आयोजन करणार असल्याचे समजते. निवडणुकीत मते फिरवण्यासाठी आजचा दिवस आणि रात्र ही शेवटची संधी असल्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्यापरीने वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत आहे.

महाआरतीचे आयोजन हा त्यातलाच एक प्रकार आहे. याखेरीज कांही उमेदवारांनी मतदारांना जीवनावश्यक साहित्य तसेच विविध घरगुती साहित्यांचे वितरण करण्याची योजना आखल्याचे सांगितले जात आहे. तथापि निवडणूक आचारसंहिता लागू असताना हे बेकायदेशीर प्रकार करण्याची तयारी संबंधित उमेदवारांनी चालविल्यामुळे जाणकार मंडळींमध्ये सखेद आश्चर्यासह अशा प्रकारामुळे संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच आपला उमेदवार निवडून यावा यासाठी कार्यकर्ते दिवस-रात्र राबत आहेत.

मतदानादिवशी जास्तीत जास्त संख्येने मतदान व्हावे यासाठी कार्यकर्ते व समर्थक कार्यरत झाले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चढाओढ सुरू झाली आहे. प्रत्येकाच्या गुप्त बैठका आणि भेटीगाठी सुरू आहेत. यंदा उमेदवारांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक उमेदवार आपल्यापरीने पूर्ण ताकदीनिशी स्वतःच्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.