केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या समर्थनार्थ शेतकरी नेत्यांच्या एका गटाने बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक येथे आज सोमवारी सकाळी टायर पेटवून आंदोलन छेडत केंद्र सरकारच्या विरोधी घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी 40 आंदोलकांना ताब्यात घेतले.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना आज सोमवारी 27 सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याने संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
या बंदला समाजाच्या अनेक घटकांकडून पाठिंबा मिळत आहे. अनेक विरोधी पक्षांनी या बंदला आपला पाठिंबा दर्शविला असून कांही नेते मंडळींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांसमवेत आंदोलनात सहभागी होण्यास तयारी दर्शवली आहे.
नव्या कृषी कायद्याच्या विरोध करण्यासाठी आज सकाळी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकासमोर जमा झालेल्या शेतकरी संघटनांच्या नेते मंडळींसह शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
त्याचप्रमाणे संतप्त शेतकरी नेत्यांनी टायर पेटवून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून 40 आंदोलकांना ताब्यात घेतले.