सुरळीत पाणीपुरवठा अभावी भाग्यनगर 6 वा क्रास येथील रहिवाशांचे अतिशय हाल होत असून गेले आठ दिवस या ठिकाणी पाणीच आलेले नाही. परिणामी 24 तास दूरची गोष्ट किमान एक -दोन तास तरी व्यवस्थित पाणी सोडा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे भाग्यनगर 6 वा क्रास येथील रहिवाशांना बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कहर म्हणजे गेल्या आठ -दहा दिवसात या भागात पाणीपुरवठाच झालेला नाही परिणामी नागरिकांचे विशेष करून एकट्या-दुकट्या राहणाऱ्या वयोवृद्धांचे अतिशय हाल होत आहेत.
पाणीपट्टी भरून देखील नळाला पाणी येत नसल्यामुळे पैशाचा भुर्दंड सहन करून पाणी विकत आणावे लागत असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कशासाठी नसले तरी स्वयंपाकासाठी पिण्याचे पाणी लागत असल्यामुळे भाग्यनगर सहावा क्रॉस येथील गृहिनी वर्ग त्रस्त झाला आहे.
यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास ते एल अँड टी कंपनीकडे बोट दाखवत आहे, तर एल अँड टीवाले स्मार्ट सिटी लिमिटेडकडे तक्रार करा असे सांगत आहेत. एकंदर नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जात आहे. स्मार्ट सिटी लिमिटेड करून 24 तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी भाग्यनगर 6 वा क्रास येथे मात्र पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सदर परिसर हा प्रभाग क्र. 42 मध्ये येतो, तरी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन भाग्यनगर 6 वा क्राॅस येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा. आम्हाला 24 तास नको किमान एक दोन -तास तरी सुरळीत पाणीपुरवठा करा, अशी जोरदार मागणी या ठिकाणच्या नागरिकांकडून केली जात आहे.