औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अनेक प्रलंबित प्रकरणांचा उद्योग क्षेत्राच्या विकासावर परिणाम होत असल्याचे लक्षात घेऊन औद्योगिक खात्यातर्फे बेळगाव येथे येत्या 11 व 12 नोव्हेंबर रोजी औद्योगिक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अखेरीस एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित राहिले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ही प्रकरणे प्रलंबित राहिल्याने औद्योगिक विकासावर परिणाम झाल्यामुळे औद्योगिक खात्याकडून बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात औद्योगिक अदालत भरवण्यासह एक दिवसाचे चर्चासत्र घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील बंगलोर, गुलबर्गा, म्हैसूर मंगळूर आदी जिल्ह्यातही एक दिवसीय उद्योग अदालत भरविण्यात येणार आहे. याखेरीज ‘उद्योजक बना -उद्योग द्या’ योजनेसंदर्भात एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
बंगळूर वगळता अन्य जिल्ह्यात अवजड उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांना अधिक प्रोत्साहन आर्थिक मदत आणि सुविधा देण्याबाबत चर्चासत्रात विचारविनिमय होणार आहे. युवकांमध्ये उद्यमशीलता मनोभावना वाढविण्याचा या कार्यशाळेचा उद्देश राहणार आहे. तसेच त्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच प्रोत्साहन देण्याचीही उद्दिष्ट राहणार आहे.
उद्योग शोधण्या ऐवजी स्वतःलाच उद्योजक बनवावे हा उद्देश ठेवून कार्यशाळा भरवण्यात येणार असल्याचे औद्योगिक खात्याकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, औद्योगिक अदालतीमध्ये किमान 75 टक्के समस्या जागेवरच सुटण्याचा विश्वास औद्योगिक खात्याने व्यक्त केला आहे.