तंदुरुस्त आणि सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत ‘नॅशनल न्यूट्रिशन मंथ’ अर्थात राष्ट्रीय पौष्टिकता मासाचे आयोजन करण्यात आले आहे. कुपोषित बालकांना शोधून त्यांना स्वस्थ आणि सुदृढ बनविणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय पौष्टिकता मासांतर्गत पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रं, शाळा, ग्रामपंचायती आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पोषण वाटिका सुरू केल्या जाणार आहेत. याठिकाणी फळे आणि पौष्टिक पदार्थांचे गरज भागविणाऱ्या रोपांची लागवड केली जाणार आहे, तर दुसऱ्या आठवड्यात गर्भवती महिला, लहान मुले आणि अल्पवयीन मुलांसाठी योगा आणि आयुष्य न्यूट्रिशन यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तिसऱ्या आठवड्यात कुपोषणाची संख्या अधिक असणाऱ्या गावांमध्ये गरजूंना न्यूट्रिशन किट वितरित केले जाईल. मासाच्या शेवटच्या आठवड्यात कुपोषित बालकांना पौष्टिक अन्न दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले असून अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात कुपोषित बालकांची संख्या अधिक असणाऱ्या गावांना भेट देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यादरम्यान कुपोषित बालकांचा शोध घेतला जाणार असून त्यांना पौष्टिक खाद्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.