बेळगाव मनपासाठी 50.41 टक्के मतदान झाले -1 लाख 13हजार 396 पुरुष तर 103764 महिला मिळून 217160 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्राचे देखील लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया मतदार यादीतील नांवे गायब होण्याच्या प्रकारामुळे उडालेला गोंधळ आणि कांही किरकोळ घटना वगळता आज शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता यशस्वीरित्या शांततेत पार पडली. महापालिका निवडणुकीसाठी यावेळी मतदानाचा टक्का घसरला असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत शेकडा 44.15 टक्के इतकेच मतदान झाले होते. तर सहा वाजे पर्यंत हा आकडा 50.41 टक्के मतदान झाले आहे.
बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांसाठी यावेळी तब्बल 385 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यापैकी 58 नगरसेवकांना शहरातील 4 लाख 30 हजार 825 मतदार मतदानाद्वारे निवडून महापालिकेत पाठविणार आहेत. निवडणूक मतदानासाठी शहरात विविध ठिकाणी 415 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. निवडणूक मतदानाला आज सकाळी ठीक 7 वाजता सुरुवात झाली. प्रारंभी मतदान केंद्रांवर मतदारांची तुरळक गर्दी दिसत होती, मात्र त्यानंतर बऱ्याच मतदार केंद्रावर मतदार रांगा लावून उत्स्फूर्त मतदान करताना दिसत होते. सकाळच्या दुसऱ्या सत्रात नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडताना दिसत होते. प्रत्येकामध्ये कमालीचा उत्साह दिसत होता. सकाळी मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर काही मत मोजकी मतदान केंद्रे वगळता अन्यत्र मतदारांची फारशी गर्दी पहावयास मिळाली नाही. तथापि कालांतराने सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पहावयास मिळाल्या. कांही मतदार केंद्रांच्या ठिकाणी प्रभागातील प्रमुख नागरिक अथवा या ठिकाणच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या हस्ते मतदानाचे मशीन असलेल्या डेस्कला पुष्पहार घालून पूजन करण्याद्वारे मतदानाचा शुभारंभ करण्यात आला. मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा उत्साह दिसून येत होता.
यावेळी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, निधर्मी जनता दल, आम आदमी पार्टी, एमआयएम हे राजकीय पक्ष महापालिका निवडणूक उतरल्यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात यावेळी कार्यकर्ते व समर्थकांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून येत होती. किती मतदान झाले? कोणी कोणी मतदान केले? याची नोंद घेण्यासाठी मतदान केंद्रांमधील उमेदवारांच्या पोलिंग एजंटची संख्या देखील यावेळी जास्त होती. त्याचप्रमाणे मतमोजणी केंद्र परिसरात जवळपास सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना माहिती देण्यासाठी टेबल टाकले आहेत. परिणामी या टेबलांची संख्यादेखील यावेळी वाढली होती.
*मतदानाची टक्केवारी*
मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर आज सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत महापालिकेच्या सर्व 58 प्रभागांमध्ये एकूण फक्त 6.54 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे वाढत गेली. सकाळी 11 वाजेपर्यंत 15.71 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 25.76 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 36.87 टक्के आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत 44.15 टक्के. तर सहा वाजे पर्यंत 50.41 टक्के मतदान झाले आहे.बेळगाव महापालिकेच्या मागील निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी असल्याचे बोलले जात आहे.
*यादीतून नांवे गायब*
मतदार यादीतून सुमारे 150 मतदारांची नावे गायब असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे आज जाधवनगर येथील मतदान केंद्राच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. प्रभाग क्र. 32 मधील जाधवनगर येथील माजी लोकप्रतिनिधींच्या संपूर्ण कुटुंबाची नावे गायब होण्याबरोबरच घराघरातील एका दुसऱ्याचे वगळता इतर सर्वांची नांवे गहाळ करण्यात आली आहेत. जाधवनगर वसाहतीतील 250 पैकी 150 नांवे गायब असल्याने मतदान केंद्राच्या ठिकाणी कांही काळ एकच गोंधळ उडाला होता.
*पोलिसांशी बाचाबाची*
शहरातील कांही मतदान केंद्रांवर उमेदवारांचे समर्थक -कार्यकर्ते आणि बंदोबस्तास असलेले पोलीस यांच्यात केंद्रात प्रवेश देण्यावरून शाब्दिक चकमकी उडाल्या. होसूर, भांदूर गल्ली आदी ठिकाणी उमेदवारांसमवेत मतदान केंद्रात जाण्याचा आटापिटा कार्यकर्त्यांकडून केला जात असल्यामुळे त्यांचे पोलिसांशी तुरळक बाचाबाचीचे प्रकार घडल्याचे पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे कांही ठिकाणी फक्त राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जात असल्यामुळे संघर्षाच्या घटना घडल्या.
*कोरोना नियमांचे पालन*
मतदान प्रक्रियेदरम्यान कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. प्रारंभी मतदान केंद्राच्या दारातच अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांकडून मतदारांचे टेम्परेचर स्क्रीनींग केले जात होते. त्यानंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतर सामाजिक अंतराच्या नियमानुसार मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जात होता. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील मतदान केंद्र परिसरात 144 कलम जारी करण्यात आले होते. तसेच प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकंदर बेळगाव महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया कांही घटना वगळता आज शुक्रवारी यशस्वीरित्या शांततेत पार पडली असून सर्व 385 उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद झाले आहे.