बेळगाव शहर. मराठी भाषिकांचे माहेरघर. या शहरात पूर्वापार काही कन्नड भाषिक राहतात हे सत्य आहे पण हा भाग मराठी बहुल आहे. हे त्या सर्वसामान्य कन्नड भाषिक नागरिकांना मान्य आहे. बेळगावातच जन्म घेतलेली अनेक कन्नड घराणी आहेत आणि ती जुनी आहेत. ही कन्नड माणसे आणि पूर्वापार बेळगावात बहुसंख्येने वास्तव्य करत आलेली मराठी माणसे आजही एकमेकांशी चांगलीच आहेत.
ही मुद्दा कुठलाही असो एकमेकांशी भांडत नाहीत तर गुण्या गोविंदयाने राहतात.मराठी माणूस महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी झटत असताना यांचा नक्कीच विरोध असतो. कुठले महाराष्ट्र रे म्हणून ती चिडवतात पण दैनंदिन जीवनात एकमेकांच्या हाताला हात धरून पुढे जाण्याची त्यांची भावना आहे. सीमाप्रश्न आणि मराठी भाषिकांचा लढा म्हणजे कन्नड विरुद्ध मराठी नव्हे हे माहीत असलेला माणूस म्हणजे बेळगावकर. त्याला बेळगावीकर करण्याचा आटापिटा ज्यांनी सुरू केला तेच शांत,संयमी आणि समृद्ध बेळगावला बदनाम करू लागले आहेत. ही परिस्थिती धोकादायक आहे.
बेळगावच्या महानगरपालिका निवडणूकीनंतर असो किंवा त्यापार्श्वभूमीवर असो बेळगावात जे काही सुरू आहे ते धोकादायक असेच आहे. नुकत्याच झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने उद्भवलेला वाद हा सुद्धा धोकादायक आहे .मराठी फलक लावला नाही फक्त कन्नड फलक लावला म्हणून संतापणारा मराठी माणूस हा सर्व पक्षीय मराठी होता. तो फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता व महाराष्ट्रात सहभागी होणारा चळवळी बेळगावकर नव्हता .सर्वपक्षीय मराठी माणसाला फक्त कन्नड मध्ये फलक लावणे पटले नाही, त्यामुळे त्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र कन्नड फलक लावला आणि मराठीला डावलले म्हणून त्या अधिकाऱ्यांचा सत्कार करणे हे कुठेतरी चुकत चालले आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतो.
बेळगाव कर्नाटकात हे मान्य करणाऱ्या कन्नड नेत्यांना बेळगाव कर्नाटकात आणि भारतीय संघराज्यात भारतीय लोकशाही राज्यात आहे हेही मान्य करावे लागेल. बेळगाव जर लोकशाही भारत देशात आहे तर तेथे राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला त्याच्या भाषेतील फलक स्थानिक स्वराज्य संस्थेकडे मागणे हा त्याचा हक्क आहे आणि तो मिळणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य .मात्र त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेने हक्क डावलणे आणि तो हक्क डावलला बद्दल त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार होणे हे कुठे तरी चुकते आहे की काय हे विचारण्याची वेळ आली आहे.
चुकतेय हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र ते मान्य न करता मराठीला डावलण्याचे नियोजन करणाऱ्यांना शांत संयमी आणि समृद्ध कन्नड आणि मराठी मिश्रित लोकांनी बनलेल्या बेळगाव वर अन्याय करायचा आहे. कुटील नियोजन करत असताना त्यांना बेळगावच्या शांततेचा भंग करायचा आहे .येथील नागरिकांच्या सामाजिक व्यवस्थेचा भंग करायचा आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय.
ज्या कन्नड रक्षण वेदिकेच्या माध्यमातून काम करणार्या नेत्यांचा अभ्यास केल्यास त्यात एकही बेळगावचा स्थानिक नाही .
बेळगावात जन्माला न येता येथील संस्कृतीची माहिती नसताना अचानक आगंतुक पणे येऊन बेळगाव कर्नाटकाचे म्हणणे सोपे आहे. मात्र बेळगावातील मराठी आणि कन्नड नागरिकांमधील सलोखा एकोपा नष्ट करण्याचे कारस्थान त्यांनी करू नये.
अन्यथा मराठीला डावलले की आपला सत्कार होतो असे वाटणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि अशी संख्या वाढली की स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिकेत काम करण्यापेक्षा मराठीला कसे लाथडता येईल हे पाहण्यातच अधिकारी जास्त गुंतेल आणि याचा फटका त्या कन्नड तथाकथित नेत्यांना ही बसल्याशिवाय राहणार नाही.