बेळगाव महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील गैरप्रकाराची सखोल चौकशी करावी. तसेच अपारदर्शी झालेली ही निवडणूक रद्द करून मुक्त वातावरणात पारदर्शी पद्धतीने निवडणूक घेतली जावी, अशी मागणी मुख्य निवडणुक अधिकारी व जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे करण्यात आली आहे.
न्यू गांधीनगर येथील मुख्तार एस. इनामदार यांनी उपरोक्त मागणी केली असून तशा आशयाचे निवेदन आज शनिवारी सकाळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव महापालिकेची निवडणूक जनतेला विश्वासात न घेता अल्पमुदतीमध्ये घाईगडबडीने उरकण्यात आली आहे.
ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट मशीन जोडलेले नसताना घेण्यात आलेल्या या निवडणुकीमुळे अनेक मतदारांना आपण कोणाला मतदान केले ते कळाले नाही. व्हीव्हीपॅट मशीन अभावी मतदारांचा आपण कोणाला मतदान केले हे जाणून घेण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट न जोडता पार पाडण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेला अनेक मतदारांनी आक्षेप घेऊन तक्रार केली. तथापि निवडणूक अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. यासंदर्भात निवडणूक होण्यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी गोपी बळ्ळारी, महेंद्र मनकाळे, विल्सन मारीहाळ, नेल्सन मारीहाळ, चार्ल्स गडदवार, लक्ष्मण पम्मार आदींनी महापालिका निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट मशीन जोडावी, अशी लेखी मागणी केली होती. तथापि त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.
या निवडणुकीत हजारो मतदारांना आपला मतदानाचा हक्क गमावावा लागला, कारण मतदार यादीत त्यांची नांवेच नव्हती. प्रभाग पुनर्रचनेत अनेक मतदारांची नांवे गहाळ झाली आहेत. निवडणुकीत बऱ्यापैकी बोगस मतदान झाले आहे. मुख्य म्हणजे बाहेरच्या अनेक नागरिकांची नांवे मतदार म्हणून यादीत घुसडण्यात आली आहेत. या सर्व गैरप्रकारांची सखोल चौकशी करून सदर निवडणूक रद्द केली जावी आणि पुन्हा नव्याने मुक्त वातावरणात पारदर्शी निवडणूक घेतली जावी.
जर का बेळगाव महापालिका निवडणूक पारदर्शी झाली असे प्रशासनासह निवडणूक आयोगाला वाटत असेल असेल तर त्यांनी उपरोक्त गैरप्रकार आणि तक्रारींसंदर्भात प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहिर स्पष्टीकरण द्यावे, अशा आशयाचा तपशील मुख्तार एस. इनामदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.