सार्वजनिक मंदिरे आणि प्रार्थनास्थळे हटविण्याचा आदेश देण्यात आला असला तरी आमचा त्याला तीव्र विरोध आहे, जर आमची मंदिर हटविण्याचा फाजील प्रयत्न केल्यास जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, सज्जड इशारा बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रणजीत चव्हाण -पाटील यांनी दिला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने एका नव्या आदेशाद्वारे सरकारला अवैधरित्या बांधण्यात आलेली सार्वजनिक मंदिरे आणि प्रार्थनास्थळे हटविण्याचे आदेश दिला आहे. त्यानुसार बेळगाव जिल्हा प्रशासनाने शहरातील अशा 29 स्थळांची यादी तयार केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आज बुधवारी सकाळी निवेदन सादर केल्यानंतर रणजीत चव्हाण -पाटील प्रसिद्धिमाध्यमांशी बोलत होते.
मंदिरे हटविण्याच्या आदेशामुळे शहरातील हिंदू धर्मीयांमध्ये असंतोष माजला आहे. तेंव्हा मंदीरांच्या बाबतीत सरकारने घिसाड घाई करू नये. संबंधित मंदिर अत्यंत जुनी असून त्यांना 150 -200 वर्षाचा इतिहास आहे. ब्रिटिश कालीन कॅम्बल यांनी लिहिलेल्या पुस्तकात या मंदिरांचा उल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अनधिकृत मंदिरे हटविण्याचा जो आदेश आहे तो गुजरात राज्यापुरता मर्यादित आहे. तथापि त्या आदेशाचा आधार घेऊन कर्नाटक राज्यात पाडविण्यात येणाऱ्या अनधिकृत मंदिरांची यादी तयार करण्यात आली आहे. खरेतर समाज हितार्थ करण्यासारखी खूप कामे आहेत, परंतु ती करायची सोडून जिल्हा प्रशासनाला मंदीरांच्या बाबतीत उचापती करायला सुचत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. याचा आम्ही देवस्थान मंडळ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तीव्र निषेध करतो तसेच आमची मंदिरे हटवण्याचा फाजील प्रयत्न केल्यास जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आम्हा सर्वांचा याला तीव्र विरोध असणार आहे. प्रशासनाचा मंदिर हटविण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असेही रणजीत चव्हाण पाटील यांनी स्पष्ट केले.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी यावेळी बोलताना हिंदू मंदिरे हटविण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असून तो त्वरित मागे घेतला जावा. कारण यामुळे शहरातील समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत असे सांगून प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पुढे करून फक्त हिंदू मंदिरांच्या मागे लागण्याची प्रशासनाची कृती संशयास्पद वाटते असे कोंडुसकर म्हणाले. त्याचप्रमाणे जर सरकार प्रशासनाने हिंदू मंदिरांना हात जरी लावला तरी ते धुळीला मिळतील.
कारण हिंदूंच्या धार्मिक भावना एक प्रकारची नाळ या मंदिरांशी जोडली गेली आहे. तेंव्हा हजारो वर्षाचा इतिहास असणाऱ्या या मंदिरांना त्यांनी कोणत्याही प्रकारे क्षती पोहोचून नये, अशी विनंती श्री राम सेना हिंदुस्तानतर्फे मी जिल्हा प्रशासनाला करत आहे, असे रमाकांत कोंडुसकर म्हणाले. याप्रसंगी विकास कलघटगी यांच्यासह शहर देवस्थान मंडळाचे पदाधिकारी, म. ए. समितीचे पदाधिकारी तसेच श्रीराम सेना हिंदुस्तानचे पदाधिकारी -कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.