‘कोरोना काळात मध्यम वर्गीयांची आर्थिक स्थिती कोलमडल्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या नेहमीच्या रक्त, लघवी तपासणी सारख्या चाचण्या पासून दूर राहावे लागले. समाजातील गरजूंची ही गरज ओळखून अथर्व मेडिकल एड फाउंडेशन या संस्थेतर्फे दि. 13 सप्टेंबर पासून सोमवार पेठ टिळकवाडी येथे ‘अथर्व डायग्नोस्टिक सेंटर’ सुरू करण्यात येत आहे. या पॅथॉलॉजी लॅबचा उपयोग गरजूंना फार मोठ्या प्रमाणात होईल’ असा विश्वास अथर्व मेडिकल एड फाउंडेशन चे अध्यक्ष विजय पाटील आणि सेक्रेटरी संतोष चांडक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या डायगणोस्टिक सेंटर बद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की,’ 2008 साली विजय पाटील, अनिल चौधरी, विनय जठार ,डॉ. माधव दीक्षित, डॉ. समीर बागेवाडी, शिरीष मालू,संजीवअध्यापक,हरिकिसन ठक्कर, भारत देशपांडे, विजय मोरे व सहकाऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या गरजू रुग्णांसाठी या फाऊंडेशनची सुरुवात केली. त्यासाठी लागणारा निधी स्वतः घालून व जनसामान्यातून फंड उभा करून निर्माण करण्यात आला. गेल्या बारा वर्षात अथर्व तर्फे अनेक रुग्णांना त्यांची इस्पितळाची उर्वरित बिले भागवण्यासाठी मदत करण्यात आली.
दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दोन दिवशी के एल ई .हॉस्पिटल व बीम्स यांच्यासोबत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. गेल्या 15 ऑगस्ट रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात 210 युनिट्स रक्त लॅबला देण्यात आले . गेल्या वर्षभरात कोरोनामुळे मध्यम वर्गीयांची आर्थिक स्थिती कोलमडली .त्याचे कारण कोणतीही विमा कंपनी किंवा सरकारी स्कीम हा रुग्णाच्या पॅथॉलॉजी लॅबचा खर्च गृहीत धरत नाही त्यामुळे काही रुग्णांना जरूर असून सुद्धा पॅथॉलॉजी लॅब पासून दूर राहावे लागले.तपासणीसाठी येणारा मोठा खर्च परवडत नसल्यामुळे काही जणांनी आपले जीव गमावले. अशा परिस्थितीत समाजाची गरज लक्षात घेऊन अथर्वने डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
अत्याधुनिक मशिनरीसह सुरू होत असलेल्या या लॅबला येणारा 15 लाखाचा खर्च लक्षात घेऊन संस्थेने देणगीसाठी आवाहन केले त्यानुसार लॅब ला लागणारी सर्व इक्विपमेंट्स खरेदी करण्यासाठी पाॅलिहैड्राॅन ग्रुप तर्फे 411690 रू, स्वर्गीय राधाबाई शंकरलाल चांडक यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाकडून दोन लाख अकरा हजार रुपये, स्वर्गीय किशोर हिरालाल मालू यांच्या स्मरणार्थ श्रीमती निर्मला मालू यांच्याकडून 1लाख 51 हजार रु ,विनय जठार, हरिकिशन ठक्कर,तेजस कदम वबेम्को हायड्रॉलिक या प्रत्येकाकडून 51हजार रूपये, बेळगाव ब्लड बँकेचे मालक गिरीश बूदरकटटी यांच्याकडून वीस हजार रुपये, नितीन कपिलेश्वरकर यांच्याकडून दहा हजार रुपये अशा भरघोस देणग्या मिळाल्या.
हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी प्रोजेक्ट चे अध्यक्ष डॉ. श्रीकांत वीरगे, उपाध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर यांनी घेतली आहे.अनुभवी टेक्निकल टीम असून अतिशय माफक दरात या लॅबमध्ये रक्त तपासणी, लघवी तपासणी व इतर तपासण्या केल्या जाणार आहेत .रोज सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत ही लॅब सुरू राहणार आहे. तरी नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी हातभार लावावा असे आवाहन अथर्व तर्फे करण्यात आले आहे