निवडणूक झाली आणि निकालाची प्रतीक्षा आहे. मागील दोन आठवडे निवडणुकीसाठी पळापळ केलेली मंडळी आता हँगओव्हर मध्ये गेली आहेत. झालेली दमछाक भरून काढून पुन्हा निकाल ऐकण्यासाठी शक्ती एकवटण्याचे काम सुरू झाले आहे.
बेळगाव मनपा निवडणूक जाहीर झाली आणि 16 ऑगस्ट पासून पळापळ सुरू झाली होती. अर्जभरणा, छाननी,माघार,चिन्हांची निवड या गडबडीत अनेकजण होते. पक्षांकडे अर्ज करून त्यांचा बी फॉर्म मिळवण्याची धावपळ करावी लागत होती. नाराजी,बंडखोरी आणि त्यात आरोप प्रत्यारोप जोरदार झाले. त्यानंतर सुरू झाली ती प्रचाराची रणधुमाळी. झोप नाही, वेळेत जेवण नाही,प्रचंड जागरण आणि धावपळ अशा वातावरणात प्रत्येक उमेदवार आणि त्याच्या मागून पळणारे कार्यकर्ते अशीच अवस्था बनली होती.
शुक्रवारी निवडणूक संपेपर्यंत ही धावपळ सुरू होती. उमेदवार कितीही अनुभवी असो वा नवखा त्यांना निवडणुकीसाठी प्रयत्न तर करावेच लागतात. यामुळे शुक्रवारी प्रत्येक पोलिंग बुथवर शेवटचे मतदान होईपर्यंत उमेदवाराला डटके राहावे लागत होते.
सुरुवातीला निवडणूक होणार की नाही याची जोरदार घालमेल पाहायला मिळाली होती. न्यायालयीन निकाल लागेतोवर अनेकांनी आपले अर्जच भरलेले नव्हते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र धावपळ झाली आणि त्यानंतर प्रचाराच्या रूपाने ही धावपळ वाढत चालली होती.
महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन पोचावे लागते. निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान होईपर्यंत उमेदवाराचे भवितव्य मतदाराच्या हातात असते. या मतदार राजाला वाकून नमस्कार करावा लागतो. मतदानाच्या दिवशी पर्यंत पाया पडून पाडवून घेतलेले एक एक मत महत्वाचे असते.
या सगळ्या गोष्टींनी मोडलेली हाडे जोडण्यासाठी आता एक दोन दिवस जाणार आहेत. मंगळवारी निकाल आहे. त्यादिवशी निवडून येणाऱ्यांना विजयोत्सव करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. तर जे पडतील त्यांना पराभव पचवून पुढील वाटचाल करावी लागणार आहे.
निवडणूक काळात कोरोना चा फज्जा झाला असून आता निकालाच्या दिवशी अधिक फज्जा उडणार आहे. यामुळे उमेदवार आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच आत्ता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. निवडणूक काळात कोरोना सुट्टीवर नव्हता हे थोड्या उशिरा लक्षात येण्यापूर्वी खबरदारी घेणे हाच रामबाण उपाय ठरणार आहे.