सीमा लढ्यातील अग्रणी असणाऱ्या येळ्ळूर गावातील मराठी भाषिकांना विविध कारणांनी डिवचण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून नेहमीच केला जात असतो.
त्यात आता भर घालत कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकारतर्फे येळ्ळूर गावात तीन ते चार ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत. तशी माहिती कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकारचे अध्यक्ष डॉ सी. सोमशेखर यांनी दिले आहे.
बेळगाव दौऱ्यावर असलेल्या डॉ. सोमशेखर यांनी सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपरोक्त माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, येळ्ळूर गांव व गडाला भेट देण्यास विविध राज्यातून लोक येत असतात. त्यामुळे हा भाग कर्नाटकाचा असल्याचे दाखवून देण्यासाठी स्वागत कमानी उभारण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे.
दरम्यान, यामुळे येळ्ळूरवासियांसह ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत अध्यक्षांसह सदस्यांनी पंचायतीसमोर जमुन कमानी उभारण्याच्या घोषणेचा निषेध केला आहे. येळ्ळूर हे गाव सीमा लढ्यात अग्रेसर आहे. यापूर्वी या गावाने अनेक अन्याय-अत्याचार धुडकावून लावले आहेत. आताही मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर गप्प राहणार नाही.
प्राधिकारने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात घेतले पाहिजे, असे मत येळ्ळूरवासियांमधून व्यक्त होत आहे. येळ्ळूरला स्वागत कमानी उभारण्याच्या निर्णयाचा सोशल मीडियावरून निषेध नोंदविला जात आहे. येळ्ळूर अन्याय अत्याचाराविरोधात कधीही झुकणार नाही, असे मतही सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.