पाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं आहे
वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या अनिमल फिडर्स ग्रुपचे सदस्य श्री कार्लेकर यांचा विमल फौंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांनी शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत सहासाचे कौतुक केलं आहे.
मागील आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे बेळगाव तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहत होते. शेती शिवारे तुडुंब भरली होती. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अशा परिस्थितीत 23 जुलै रोजी एक व्यक्ती धामणे रोडवर नाल्याच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्यातून वाहून जात होता.
यावेळी ऍनिमल फिडर्स ग्रुपचे सदस्य श्री कार्लेकर आपल्या सहकाऱ्यांसमवेत जात होते. त्यांनी त्या व्यक्तीला वाहून जाताना पाहिले आणि क्षणाचाही विचार न करता कार्लेकर आणि सहकाऱ्यांनीआपल्या जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात पटापट उड्या घेऊन गटांगळ्या खात वाहून जाणाऱ्या इसमास पाण्याबाहेर काढले व त्याचा जीव वाचवला होता.
श्री कार्लेकर आणि सहकाऱ्यांच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे बुडणाऱ्या इसमाचे प्राण वाचले. त्याच्या या धाडसीवृत्तीचे कौतुक करीत किरण जाधव यांनी श्री कार्लेकर आणि सहकाऱ्यांचा शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्लेकर याची आपण शौर्य पदकासाठी शिफारस केल्याचे यावेळी किरण जाधव यांनी सांगितले.
कोरोनाच्या सावटात मुक्या प्राण्यांच्या पोटाचे हाल होत होते. याची दखल घेऊन किरण जाधव यांच्या सहकार्याने श्री कार्लेकर आणि सहकाऱ्यांनी टाळेबंदीच्या काळात ऍनिमल फिडर्स ग्रुपच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आणि अजूनही हा उपक्रम राबविला जात आहे.