एखाद्याला व्हिडीओ कॉलिंगद्वारे मिळविलेले त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणारी टोळी बेळगावात सक्रिय झाली असून नागरिकांनी या टोळी पासून सावध रहावे असे आवाहन बेळगाव सायबर पोलिसांनी केले आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये तुमचा फोटो बघून तो फोटो लाईक करुन फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवणे. ती एक्सेप्ट केल्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून चॅटिंग सुरू करणे, व्हिडिओ कॉलवर अश्लील संभाषण सुरू करणे, अश्लील पोझ देणे आणि तशी पोझ दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीस घेण्यास सांगून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतो असे धमकावून ब्लॅकमेल करणारी टोळी बेळगावात सक्रिय झाली आहे.
या टोळीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे आणि सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी केले आहे. व्हिडीओ कॉलिंग गॅंगपासून नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे. व्हिडीओ कॉलिंगद्वारे, सायबरद्वारे बेळगावात अनेक जण फसले गेले आहेत. आता हा नवीन प्रकार बेळगावात सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.
व्हिडीओ कॉलिंग करून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीच्या जाळ्यात शहरातील अनेक जण अडकले आहेत. त्यापैकी काहींनी ब्लॅकमेल करणाऱ्यांना मागतील तितके पैसे दिले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कांही जण तर पैसे देऊन देऊन कंगाल -कर्जबाजारी झाले आहेत, तर काहींनी धीराने आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात नोंदविले आहे.
ब्लॅकमेलिंग साठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सीईएन पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी जनतेला सावधानतेचा इशारा दिला असून ते या सायबर गुन्हा मागील सूत्रधाराच्या शोध घेत आहेत. गुन्हेगारांना हुडकून त्यांच्याकडून लुबाडले पैसे परत मिळविण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
व्हिडीओ कॉलिंगद्वारे ब्लॅकमेल करणारी टोळी ओळख पटू नये यासाठी नाका तोंडाला पट्टी बांधून लोकांची लुबाडणूक करत आहे. तेंव्हा अनोळखी व्यक्तीच्या व्हिडिओ कॉलना प्रतिसाद देऊ नका. व्हिडीओ कॉलिंग दरम्यानची चित्रे गुन्हेगार रेकॉर्ड करून घेऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. सेक्सी कॉलिंग रॅकेटपासून सर्वांनी सावध राहावे आणि फसवणूक झालेल्यांनी मार्केट पोलीस स्थानकाचा शेजारील सीईएन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.