सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधक मोफत लसीकरण मोहिमेचा येळ्ळूर (ता. बेळगाव) येथे राजकीय स्वार्थासाठी वापर करण्यात येत असल्याचा आरोप केला जात असून लस घेण्यासाठी फॉर्म भरण्याची सक्ती केली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येळ्ळूर (ता. बेळगाव) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 5 केंद्रे स्थापण्यात आली असून याठिकाणी आज लसीचे 1200 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तथापि सदर लसीकरण केंद्रांसमोर बॅनर लावून एका राजकीय नेत्याची प्रसिद्धी केली जात आहे. त्याचप्रमाणे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना संबंधित नेत्याचा फोटो असणारा फॉर्म भरण्याची सक्ती करण्यात येत असून फॉर्म भरला तरच लस दिली जाईल, असे सांगितले जात आहे.
लसीकरण केंद्रासमोर प्रसिद्धीसाठी बॅनर लावणे ही गोष्ट नागरिक समजू शकतात. मात्र सरकारकडून लस मोफत दिली जात असताना फॉर्म भरण्याची सक्ती का? असा संतप्त सवाल केला जात आहे. तसेच याबाबत जाब विचारल्यास संबंधित नेत्याच्या दहशतीमुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी देखील या बाबतीत मूग गिळून गप्प बसत असल्याचे समजते.
लसीकरण केंद्राचा वापर ज्या नेत्याच्या प्रसिद्धीसाठी केला जात आहे तो नेता एका राष्ट्रीय राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असल्यामुळे त्याचा फोटो असलेला फॉर्म भरण्यास बहुसंख्य नागरिकांचा विरोध आहे. तथापि फॉर्म भरल्या शिवाय लसीकरणास परवानगी दिली जात नसल्यामुळे संबंधित नागरिकांनी आता कोठे जाऊन लस घ्यायची? असा सवाल केला जात आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.