राणी चन्नम्मा एक्सप्रेस या नैऋत्य रेल्वेच्या सर्वात लोकप्रिय रेल्वेने आज 15 ऑगस्ट रोजी आपला 26 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केला आहे. उत्तर कर्नाटकातील लोकांसाठी राणी चन्नम्मा एक्सप्रेस रेल्वे फक्त रेल्वे नाही तर त्याहूनही खूप कांही आहे. विशेष करून बेळगाव, हुबळी -धारवाडहून राजधानी बेंगलोर गाठणाऱ्यांसाठी तर ती एकदम खास आहे.
रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1995 रोजी बेंगलोर आणि मिरज (महाराष्ट्र) दरम्यान राणी चन्नम्मा एक्सप्रेस सुरु करण्यात आली. पुढे 2002 मध्ये या रेल्वेची सेवा बेंगलोरपासून कोल्हापूरपर्यंत वाढविण्यात आली, जी आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या 26 वर्षापासून उत्तर आणि दक्षिण कर्नाटकाला जोडणाऱ्या नैऋत्य रेल्वेच्या रेल्वेंपैकी ही एक महत्त्वाची रेल्वे आहे.
रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होण्यापूर्वी या रेल्वेला कर्नाटक एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि कित्तूर एक्सप्रेस असे संबोधले जात होते. ही रेल्वे पुणे आणि बेंगलोर दरम्यान धावत होती. 1986 साली तुमकुरचे खासदार जी. एस. बसवराजू यांनी या रेल्वेला ‘कित्तूर राणी चन्नम्मा एक्सप्रेस’ असे नांव देण्याची मागणी संसदेत केली होती. तसेच त्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे 1995 साली रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर बसवराजू यांची मागणी रेल्वे मंत्रालयाने अखेर मान्य केली.
वेळापत्रक अचूक पाळण्याच्या हातोटीमुळे बेळगाव आणि हुबळी-धारवाडहून बेंगलोरला जाणाऱ्या लोकांमध्ये ही अल्पावधीत रेल्वे लोकप्रिय झाली.
उत्तर कर्नाटकातील विविध भागात जाण्यासाठी विशेष करून राजकीय नेते या रेल्वेचा आधार घेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे या रेल्वेचे ‘रेग्युलर पॅसेंजर’ होते. बेळगाव, हुबळी -धारवाड, हावेरी, दावणगिरी आदी ठिकाणचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, उद्योजक, व्यापारी बेंगलोरला जाण्यासाठी या रेल्वेचे सहाय्य घेत.