Saturday, December 21, 2024

/

पत्र मोहिमेत महिलांची आघाडी

 belgaum

महाराष्ट्र-कर्नाटक बेळगाव सीमाप्रश्नी आपण वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा आणि आम्हा 20 लाख मराठी बांधवांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा, अशा मागणीची एक हजाराहून अधिक पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांवे पाठविण्याची मोहीम आज सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीतर्फे राबविण्यात आली. सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांसह शहरातील विविध महिला मंडळांच्या पत्रांचा यामध्ये समावेश आहे.

आजच्या 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून म. ए. समितीच्या महिला आघाडीतर्फे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पंतप्रधानांच्या नांवे पत्रे पाठविण्याची मोहीम राबविण्यात आली. शनिवार खुट येथील महिला आघाडीच्या कार्यालयामध्ये अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आणि माजी महापौर सरिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभा कदम, विणा सूर्यवंशी, प्रभावती गवळी, कौमुदी पाटील, सुकन्या पाटील, मृदुला किल्लेकर, प्रियांका जेलुगडेकर आदी महिला कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रे लिहिली. त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील विविध महिला मंडळांच्या भेटी घेऊन त्यांनादेखील पंतप्रधानांच्या नांवे पत्र लिहिण्यास प्रोत्साहित केले.Letter to pmo

याव्यतिरिक्त महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, सरिता पाटील, सुषमा कोवाडकर आदिंनी 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनातील सुळगा -हिंडलगा येथील हुतात्मे मोहन लक्ष्‍मण पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच हुतात्मा मोहन पाटील यांचे भाऊ अनिल लक्ष्मण पाटील, अपर्णा अनिल पाटील व प्रतीक अनिल पाटील यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांवे सीमाप्रश्नाच्या बाबत पत्र लिहून घेतले. यशोदरा महिला मंडळ रामलिंग खिंड गल्ली, माऊली महिला मंडळ केळकर बाग, गुरुदत्त मित्र मंडळ केळकर बाग यांच्यावतीनेही नरेंद्र मोदी यांना पत्रे धाडण्यात आली.

नरेंद्र मोदी पंतप्रधान, भारत सरकार, नवी दिल्ली यांसी, 1956 पासून भाषावार प्रांत रचनेमुळे आम्हा मराठी भाषिकांना अन्यायाने कन्नड भाषिक राज्यात डांबण्यात आले आहे. गेल्या 65 वर्षापासून मराठी भाषीक न्यायासाठी लढत आहेत. कृपया यात वैयक्तिक लक्ष घालून बेळगाव सीमा प्रश्न सोडवावा व आम्हा 40 लाख मराठी बांधवांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा, ही कळकळीची विनंती, अशा आशयाचा तपशील म. ए. महिला आघाडीतर्फे पंतप्रधानांना पाठविलेल्या एक हजाराहून अधिक पत्रांमध्ये नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.