कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने काढलेल्या आदेशानुसार या शनिवार 14 आणि रविवार 15 ऑगस्ट रोजी वीकेंड कर्फ्यू लागू असणार आहे. मात्र रविवारी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी थोडी सवलत मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी गेल्या शुक्रवारी संबंधित अधिकारी आणि आरोग्य तज्ञांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी अधिकारी व तज्ञांनी आगामी सणासुदीचा मोसम लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलात आणण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्टपासून 16 ऑगस्टपर्यंत खालील अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलात आणल्या जाणार आहेत.
1) राज्यभरात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू कायम राहील. 2) महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या बेळगाव, बीदर, विजयपुरा आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये आणि केरळच्या सीमेवरील मंगळूर, कोडगु, म्हैसूर व चामराजनगर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत साप्ताहिक संचार बंदी अर्थात वीकेंड कर्फ्यू लागू राहील. 3) सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन प्रकारांसह अन्य सामुहिक कार्यक्रमांवर तसेच मेळावे व सभांवर प्रतिबंधक असेल. तथापि कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून 100 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा अथवा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी असेल. दफनविधी अथवा अंत्यविधीला 20 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसेल. यापूर्वीच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्था कार्यरत राहू शकतात. 4) कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करून योग्य वर्तणुकीसह मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा आणि अन्य धार्मिक स्थळांची ठिकाणे खुली ठेवून संबंधित धार्मिक विधी करण्यास परवानगी असेल. तथापि यात्रा, मंदिरांचे उत्सव, मिरवणूक आणि सभा आयोजनास परवानगी नसेल.
*विकेंड कर्फ्यू मार्गदर्शक सूची :* जीवनावश्यक सेवा, आपत्कालीन सेवा वगळता शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत कडक संचारबंदी असेल. 1) अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन सेवा, वैद्यकीय सेवा, कोरोना प्रतिबंधक आणि व्यवस्थापन सेवेशी निगडीत सर्व राज्य व केंद्र सरकारी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. या सेवांशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुक्तसंचार यांची परवानगी असेल. 2) आपत्कालीन आणि जीवनावश्यक सेवेसाठी 24 तास कार्यरत राहणाऱ्या उद्योग, कंपन्या आणि संघटना सुरू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अधिकृत ओळखपत्र असले पाहिजे.
त्याचप्रमाणे संघटना संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शक्यतो घरातून काम करण्यास प्रोत्साहन द्यावे. 3) टेलिकॉम आणि इंटरनेट कर्मचाऱ्यांना ओळखपत्रासह संचारास परवानगी असेल. 4) रुग्ण व त्यांच्या सहाय्यकांसह तातडीचे काम आणि लसीकरणास जाणाऱ्यांना तसा किमान पुरावा दाखवावा लागेल. 5) खाद्यपदार्थ, किराणामाल, फळे, भाजीपाला, मटण आणि मासे विक्री दुकानांसह दूध केंद्रे व पशुखाद्य दुकाने सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.
रस्त्यावरील विक्रेते आणि वितरण व्यवस्थेची दुकाने, स्वतंत्र दारू दुकाने (टेक अवे पद्धतीने) सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी असेल. घरपोच सेवा 24 तास खुल्या राहतील. 6) उपहारगृहे व खानावळी टेक अवे पद्धतीने सुरू ठेवता येतील. 7) रेल्वे आणि विमान सेवा सुरू राहिल. प्रवाशांना ने-आण करणाऱ्या खासगी वाहनांना परवानगी असेल. मात्र त्यांना प्रवासाचे तिकीट वगैरे अधिकृत कागदपत्रे दाखवावी लागतील.