नरगुंदकर भावे चौका नंतर आता पुतळा उभारण्यासाठी शिव छत्रपतींचा राजहंस गड टार्गेट करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.येळ्ळूर आणि परिसरात एकूण 100 कार्यकर्ते सध्या उपस्थित असून हे पुतळ्याचे राजकारण शांतता भंग करीत आहे.
बेळगाव शहरातील प्रमुख व्यापारीपेठ आणि स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेब नरगुंदकर यांच्या नावचा असलेल्या नरगुंदकर भावे चौकाकडे काही महाभागांनी आपली वक्र दृष्टी वळविलेली असल्याच्या माहितीने वातावरण अशांत झाले होते.त्यातच राजहंस गडाकडे नजर वळविण्यात आल्याच्या बातमीने तणाव वाढला आहे. पुतळा उभारण्याच्या नावाखाली समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला असून याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
भावे चौक व्यापारासाठीचे केंद्र आहे. बेळगाव शहरातील एक प्रमुख चौक असून याठिकाणी काही चुकीचे घडल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शहरावर दिसून येतो,असे असताना काही चुकीचे प्रयत्न केले जात असून यामागे भाषिक भावना दुखावण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.यामुळे दिवसभर उलट सुलट बातम्या ऐकायला मिळाल्या.
यापूर्वी अनेक प्रकरणात पुतळा उभारण्याच्या नावाखाली भाषिक वाद निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रयत्नांनी सारे वातावरण गढूळ झाले होते, याचा विचार करून पोलिसांनी अशा प्रकारांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.
कोरोनाचा काळ असल्याने बराच काळ त्याचा नागरी जीवनावर परिणाम झाला आहे. त्यातच निवडणूक तोंडावर असून कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
राजहंस गडाच्या बाबतीत शिवप्रेमी नागरिकांच्या भावना तीव्र असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कठोर शासन करण्याची गरज आहे. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या सह राजू पावले, सतीश कुगजी आणि शेकडो शिव प्रेमी युवक रात्री उशीर पर्यंत दाखल ठाण मांडून होते तर युवा आघाडीचे संतोष मंडलिक ,ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर दत्ता उघाडे यांनीही धाव घेतली होती.गडावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.