राज्यात यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोठेही कोणत्याही राष्ट्रपुरुषांचे पुतळे आणि स्मारकांची उभारणी करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे. राज्य सरकारने तसा आदेश जारी केला आहे. त्याचप्रमाणे नागरिक वसाहतीच्या 30 मीटरच्या परिघात असणाऱ्या नदी, नाले व तलावाच्या काठावर कोणत्याही प्रकारचे स्मारक बांधण्यावर निर्बंध घातले आहेत.
राष्ट्रपुरुषांचे पुतळे आणि स्मारकांवरून सध्या बराच गदारोळ माजला आहे. अलीकडेच बेळगाव जिल्ह्यात पुतळ्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. कांही कन्नड संघटनांनी पुतळ्यांचे राजकारण करून शहरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न वारंवार केल्यामुळे शांततेला सुरुंग लागत आहे.
त्याचप्रमाणे दोन भाषांमध्ये तेढ निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र आता राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारण्यास स्मारक निर्माण करण्यास बंदी घातल्याने अशा प्रकारांना आळा बसणार आहे.
पुतळे व स्मारकांच्या राजकारणामुळे पोलीस प्रशासनावरील ताण वाढत आहे.
एकंदर राज्य सरकारच्या आदेशानुसार आता राज्यात यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारणे आणि स्मारकांची निर्मिती करण्यावर निर्बंध राहणार आहे. या निर्बंधासह नागरिक वसाहतीच्या 30 मीटरच्या परिघात असणाऱ्या नदी, नाले व तलावाच्या काठावर देखील कोणत्याही प्रकारचे स्मारक बांधण्यावर बंदी असणार आहे.
सूचना देऊनही पुतळे उभारणे, स्मारक उभारणे तसेच बांधकाम करण्याचे प्रयत्न झाल्यास स्थानिक प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.