सेवानिवृत्त झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार्या निवृत्ती वेतनावर आयकर लावला जाऊ नये. हे निवृत्ती वेतन आयकर मुक्त केले जावे, या राष्ट्रपतींकडे केलेल्या मागणीसह अन्य विविध मागण्या ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
ऑल इंडिया सफाई मजदूर (एआयएसएम) काँग्रेसचे राज्य अध्यक्ष काशिराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सदर मागण्यांची निवेदने जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सफाई मजदूर काँग्रेसतर्फे राष्ट्रपतींना धाडलेल्या निवेदनात सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती नंतरचे जीवन त्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर चालते. सरकारी कर्मचारी 30 -35 वर्षाची सेवा संपल्यानंतर वृद्ध होऊन थकलेले असतात. विविध व्याधींनी त्यांना ग्रासलेले असते. त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतात. आपल्या औषध पाण्याच्या खर्चाबरोबरच त्यांना आपल्या पत्नीच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे चरितार्थासाठी खर्च येत असतो तो वेगळा. या बाबी लक्षात घेऊन त्यांचे निवृत्ती वेतन आयकर मुक्त केले जावे, अशा आशयाचा तपशील नमूद आहे
ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या दुसऱ्या निवेदनाव्दारे गेली 28 -30 वर्षे महापालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. इतकी वर्षे काम करून देखील सदर कर्मचाऱ्यांची नांवे अद्यापही हंगामी सफाई कर्मचाऱ्यांच्या यादीत आहेत. या कामगारांपैकी अर्धे कामगार या जगात राहिलेले नाहीत. त्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी होती ती देखील मिळालेले नाही. आता उर्वरित कामगार देखील दोन चार वर्षात निवृत्त होतील किंवा निधन पावतील. याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कामगारांना सेवेत कायम करावे. त्याचप्रमाणे त्यांना राहण्यासाठी कॉर्टर्स दिले जावेत, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती काशीराम चव्हाण यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.
मुंबईमध्ये आमच्या एका सफाई कर्मचाऱ्यांची पत्नी राहते. ती ज्या अपार्टमेंटमध्ये राहते त्या अपार्टमेंटमधील सवर्ण लोक तिला तिथे राहण्यास विरोध करताहेत. तिला प्रचंड त्रास देत आहेत. तेंव्हा संबंधित महिलेला संरक्षण देण्यासह तिला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ते निवेदन देखील आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करत आहोत, असेही काशीराम चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसचे मुरली चव्हाण व इतर सदस्य उपस्थित होते.