विकास कामे पूर्ण झालेले टिळकवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै उद्यान गेल्या जवळपास 2 वर्षापासून बंद ठेवण्यात आल्यामुळे सकाळी फिरावयास जाणाऱ्यांची (मॉर्निंग वॉकर्स) मोठी गैरसोय झाली असून हे उद्यान सार्वजनिकांसाठी तात्काळ खुले केले जावे, अशी मागणी केली जात आहे.
उद्याने ही लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी आणि वयस्करांना स्वच्छ मोकळ्या हवेत मॉर्निंग वॉक, व्यायाम करता यावा यासाठी असतात. टिळकवाडी येथील बुधवार व गुरुवार पेठ या रस्त्याला लागून असणारे बॅरिस्टर नाथ पै उद्यान हे शहरातील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक आहे. या जुन्या उद्यानाचा विकास कामे राबवून चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय 2018 -19 आली घेण्यात आला.
बेळगाव महापालिकेच्या तत्कालीन सभागृहाने सरकारच्या 100 कोटी रुपयांच्या विकास निधी अंतर्गत या उद्यानाच्या विकासाला सुरुवात केली. त्यानंतर या ठिकाणची कांही विकास कामे स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हाती घेण्यात आली. बॅरिस्टर नाथ पै उद्यानात व्यायामाची साधने बसविणे, पेव्हर्स घालून फिरण्यासाठी वॉकिंग पाथ तयार करणे, हिरवळीची निर्मिती, कमान असलेल्या प्रवेशद्वाराची उभारणी, छत असलेली बसण्याची आसन व्यवस्था करणे आदी विकास कामे राबवून पूर्ण करण्यात आली आहेत. या उद्यानाचा विकास आणि सुशोभीकरणासाठी एकूण 81 लाख 81 हजार 556 रुपये खर्च करण्यात आले आहेत.
विकास कामे पूर्ण झाली असली तरी हे उद्यान अद्यापही सार्वजनिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. मध्यंतरी कोरोना प्रादुर्भावामुळे उद्याने बंद ठेवण्यात आली असली तरी त्यानंतर अलिकडे कोरोनाचे सर्व नियम शिथिल झालेले असताना देखील हे उद्यान बंदच आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी फिरावयास जाणाऱ्या टिळकवाडी परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
बरेच जण भल्या पहाटे फिरावयास घराबाहेर पडतात. या लोकांना उद्यान बंद असल्यामुळे रस्त्यावर मॉर्निंग वॉक करावा लागत आहे तथापि रस्त्यावरून फिरताना भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सहन करावा लागतो. कांही ठिकाणी तर अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यांमुळे मॉर्निंग वाॅकर्सना जीव मुठीत धरून जावे लागते.
नाथ पै उद्यान बंद असल्यामुळे मोकळ्या हवेत व्यायाम करण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध नसल्यामुळे वयस्क मंडळींना लेले मैदान, व्हॅक्सीन डेपो मैदान अथवा आसपासच्या शाळांच्या मैदानावर जाऊन व्यायाम करावा लागत आहे. घराजवळ हे उद्यान असूनही येथील नागरिकांना आपल्या मुलाबाळांना घेऊन दूरच्या उद्यानात जावे लागत आहे. तरी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून बॅरिस्टर नाथ पै उद्यान तात्काळ सार्वजनिकांसाठी खुले करावे, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांच्यासह सकाळी फिरावयास जाणाऱ्या मॉर्निंग वाॅकर्सनी केली आहे.