महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या सहा सूचकांना जी सर्टिफाइड कागदपत्रांची त्रासदायक सक्ती करण्यात आली होती, यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज महापालिका प्रभारी आयुक्त प्रवीण बागेवाडी यांची भेट घेतली. तेंव्हा आयुक्तांनी तात्काळ सर्व विभागांचे निवडणूक निर्वाचन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन फक्त उमेदवारांना सर्टिफाइड कागदपत्रांची सक्ती करावी, मात्र त्यांच्या सूचकांना तशी सक्ती करू नये, अशी सक्त सूचना केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी म्हणाले की, महापालिका निवडणुकीसाठी मराठी भाषिकांना उमेदवारी अर्ज मराठीतून मिळावेत यासाठी यशस्वी पाठपुरावा केल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उमेदवारांच्या निवडणुकीसंदर्भातील समस्या दूर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांबरोबर सहा सूचक आणि त्या सूचकांना विविध सर्टिफाइड कागदपत्रांची सक्ती करण्यात आली होती. यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी व मुख्य निवडणूक निर्वाचन अधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सूचनेवरून मनपा प्रभारी आयुक्त प्रवीण बागेवाडी यांची भेट घेतली.
राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला एक सुचक आणि अपक्ष उमेदवाराला सहा सुचक तसेच त्या सहा सूचकांना सर्टिफाइड कागदपत्रांची सक्ती असा पक्षपातीपणा कशासाठी? अशी विचारणा करून सहा सूचकांना सर्टिफाइड कागदपत्रे मिळविण्यासाठी होणारा त्रास त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी त्यांनी तात्काळ सर्व विभागाच्या निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांना बोलावून इच्छुक उमेदवारांच्या सूचकांना कागदपत्रांची सक्ती न करता फक्त त्यांची नांवे मतदार यादीत असतील याची खातरजमा करावी, अशी सक्त सूचना केली आहे. तेंव्हा नागरिकांनी याची नोंद घेऊन जिल्हा प्रशासन व महापालिकेला सहकार्य परंतु उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन कलघटगी यांनी केले.
दत्ता जाधव यांनी देखील उमेदवारांनाच फक्त सर्टिफाइड कागदपत्रांची सक्ती असणार आहे. सूचकांना उमेदवारी अर्जासोबतच्या कागदपत्रांमध्ये फक्त मतदार यादीतील आपले नांव आणि क्रमांक लिहावयाचा आहे, असे स्पष्ट केले. मनपा प्रभारी आयुक्त बागेवाडी यांच्या भेट घेणाऱ्या समितीच्या शिष्टमंडळामध्ये कलघटगी, शिवसेनेचे आरोग्य मदत कक्ष प्रमुख दत्ता जाधव व बाळू जोशी यांच्यासह समितीचे अन्य सदस्यांचा समावेश होता.