बेळगाव महानगरपालिका निवडणुकीशी मध्यवर्ती म. ए. समितीचा कांहीही संबंध नसला तरी महापालिकेवर भगवा फडकविणे आवश्यक आहे. यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीकडून एकजुटीसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे असताना मध्यवर्ती समितीने हस्तक्षेप थांबवावा, अशा आशयाचे एका वर्तमानपत्रात मध्ये प्रसिद्ध झालेले किरण गावडे यांचे पत्रक निराधार -बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहे, असे स्पष्टीकरण मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी केले आहे. तसेच मराठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करून मराठी उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही केले आहे.
‘मध्यवर्ती म. ए. समितीने हस्तक्षेप थांबवावा’ या शीर्षकाखाली किरण गावडे यांचे पत्रक एका वर्तमानपत्राच्या आजच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना बेळगाव महानगरपालिका निवडणुकीशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा कांहीही संबंध नाही. बेळगाव महापालिकेवर भगवा फडकविणे आवश्यक आहे. त्यासाठी मध्यवर्ती म. ए. समिती मराठी जनतेस आवाहन करीत आली आहे. बेळगाव महापालिकेचा भाग शहर म. ए. समिती व तालुका म. ए. समितीच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे दोन्ही समितीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. उमेदवार निवडीपासून त्यांना विजयी करण्याची जबाबदारी त्या-त्या वॉर्डातील पंच मंडळी आणि नागरिकांनी उचललेली आहे.
अनेक ठिकाणी तेथील नागरिकांनी एका उमेदवाराची निवड करून रंगुबाई पॅलेस येथील समिती कार्यालयात त्यांची नावे दिली आहेत. अद्यापही कांही ठिकाणी एकी होत नसल्याने एकीचे प्रयत्न सुरू आहेत, असे असताना मध्यवर्ती म. ए. समितीने हस्तक्षेप थांबवावा असे निराधार आणि बिनबुडाचे पत्रक छापून किरण गावडे यांनी लोकांची दिशाभूल करू नये. मुळात पत्रकात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे कोणती समिती एकी करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि किरण गावडे कोणत्या समितीचे सरचिटणीस आहेत याचा खुलासा करावा, असे मालोजीराव अष्टेकर यांनी आपल्या स्पष्टीकरणात नमूद केले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या या स्पष्टीकरण पत्रात संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीने मध्यवर्तीच्या पुनर्रचनेचे दिलेले अधिकार, सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी सुरू असलेल्या दाव्याबाबत मध्यवर्ती करत असलेले काम, मागील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार निवड आदींची माहिती देण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर तालुक्यातील उमेदवारांची निवड स्थानिक समितीने केली असताना कोल्हापूरहून उमेदवार लादले असे म्हणणे ही वैचारिक दिवाळखोरी आहे, असे स्पष्टीकरणात म्हंटले आहे.
वृत्तपत्रात पत्रक प्रसिद्धीस देऊन मराठी मतदारात गोंधळ निर्माण करणे आणि आपल्या मर्जीतील लोकांची यादी जाहीर करण्याचा किरण गावडे यांचा मानस दिसत आहे. तेंव्हा मराठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करून मराठी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी केले आहे.