बेळगाव महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासह संबंधित अन्य कागदपत्रे कन्नडसह मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिका निवडणुकीची घोषणा केली असून 16 ऑगस्टपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी उमेदवारी अर्जांचे वितरण केले जात आहे.
मात्र हे उमेदवारी अर्ज फक्त कन्नड भाषेतच छापलेले आहेत. हे अर्ज मराठी भाषिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. आम्ही बेळगावातील भाषिक अल्पसंख्यांक असून देखील संबंधित खाते आम्हाला इंग्रजी अथवा मराठी भाषेतील उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यास नकार देत आहे. ज्या प्रदेशात भाषिक अल्पसंख्यांक 15 टक्के किंवा त्याहून अधिक आहेत अशा ठिकाणी सरकारी आदेश, परिपत्रके स्थानिक संबंधित भाषेत भाषांतरित करून दिली जावीत, असा आदेश आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुक्यामध्ये मराठी भाषिकांची संख्या 15 टक्क्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथील मराठी भाषिकांना उमेदवारी अर्जासह सर्व सरकारी कागदपत्रे मराठीत मिळाली पाहिजेत. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने देखील बेळगावात आवश्यक सरकारी कागदपत्रे, बिले, आदेश वगैरे मराठीतून द्यावेत अशी सूचना राज्य सरकारला केली आहे.
याची दखल घेऊन निवडणुकीसाठी इच्छुक मराठी उमेदवारांना त्यांचे उमेदवार अर्ज मराठी भाषेत उपलब्ध करून देऊन अल्पसंख्यांक मराठी भाषिकांच्या घटनात्मक आणि वैधानिक अधिकाराची सुरक्षा केली जावी. संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले जावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
महापालिका निवडणुकीसाठी कन्नडमधील उमेदवारी अर्ज भरणे मराठी भाषिक इच्छुकांना कठीण जात आहे. तेंव्हा निवडणुकीसंदर्भातील उमेदवारी अर्जासह इतर कागदपत्रे कन्नडसह इंग्रजी आणि मराठी भाषेत दिली जावीत आणि तशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आपण द्यावी, अशी विनंती दीपक दळवी यांनी यावेळी जिल्हाधिकार्यांना केली. माजी आमदार मनोहर किणयेकर यांनी यापूर्वीच्या महापालिका निवडणूकीप्रसंगी कन्नड, मराठी व इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उमेदवारी अर्ज व इतर कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. निवेदन सादर करतेवेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.