एक मत पडत नाही
पोकळ बाता डोंगराएवढ्या
उंदीर आणि मांजराच्या युतीचा
कन्नडीगांनी चंग बांधला
मराठीच्या विरोधात गाजत आहेत
पत्रकारपरिषदा
मात्र चार चौघात गरजणाऱ्या वाघांचा
निवडणुकीत होणार चेंदामेंदा
गरज फक्त एकच आहे
व्हायला पाहिजे एकी
वॉर्डा वॉर्डातील भांडणाचीच
फुटली पाहिजेत डोकी
स्वतः सत्ताधीश होण्याच्या स्वार्थासाठी
घोटू नका मराठीचे गळे
करवे च्या भूलथापांना
शिकवले पाहीजेत धडे
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ॲक्टिव झालेल्या काही कन्नड कार्यकर्त्यांनी मराठी विरोधातील आपली कोल्हेकुई सुरू ठेवली आहे.
महानगरपालिकेवर कोणत्याही स्वरूपात मराठी महापौर होऊ नये यासाठी भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी एक व्हावे असे आवाहन काही करवे कार्यकर्त्यांनी केले. यापूर्वी मराठी उमेदवारांच्या संदर्भात बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करावी.
निवडून येणारा प्रत्येक मराठी उमेदवार आपला म्हणण्याचे प्रकार सोडावे असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर आता कन्नड संघटनांची कोल्हेकुई सुरू झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने घरा बाहेर पडलेल्या वाघांनी आता मराठी माणसाचा पराभव करण्यासाठीचे नियोजन सुरू केले असून, आता मराठी माणसाने आपल्या आपल्या वॉर्डात एकमेव उमेवार उभा राहून मराठीचा विजय होण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे.
तिकडे काँग्रेस आणि भाजप युतीचा प्रयत्न सुरू असताना, अद्याप आपल्या वॉर्डातील दोन मराठी उमेदवारातील एकीचे नियोजन करणे अशक्य बनले आहे .पंचमंडळीनी उमेदवाराचे नाव दिलेले असताना दुसरा उमेदवार मला अधिकृत करून द्या म्हणून आपल्या समर्थकांसह पंच मंडळींकडे गर्दी करत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात होणारी गर्दी पाहता अद्याप अनेक जण इच्छुक आहेत आणि त्यांना निवडणुकीतून माघार घ्यायची नाही हेच स्पष्ट होत आहे.
त्यामुळे आता मराठीचा विजय करायचा झाल्यास शहाणपणा दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे .मराठी महापौर होऊ नये यादृष्टीने विरोधकांनी चालवलेले प्रयत्न लक्षात घेऊन प्रत्येकाने शहाणे होण्याची गरज आहे.
प्रत्यक्षात 40 पलस चे ध्येय बाळगणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला यशस्वी करायचे असेल तर प्रत्येक वॉर्डातील भांडणे तंटे आणि स्वतः उमेदवार होऊन निवडून येण्याचा स्वार्थ प्रत्येकाने सोडण्याची गरज आहे. स्वतःहून मोठे मन दाखवल्यास काही वार्डात सुरू असलेले प्रकार बंद होणार असून या पार्श्वभूमीवर आता लवकरात लवकर कार्यवाही होण्याची गरज निर्माण झाली आहे.