बेळगाव महानगरपालिका निवडणूक मुक्त वातावरणात पारदर्शी, न्यायसंयुक्त आणि निःपक्षपाती पार पाडणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकाने आपले काम अत्यंत दक्षतेने पार पाडावे, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त डॉ. बी. बसवराज यांनी आज अधिकाऱ्यांना दिली.
महानगरपालिका निवडणूक -2021 संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज गुरुवारी सकाळी आयोजित जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस आयुक्तांसह जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी, निवडणूक निरीक्षक आणि विविध निवडणूक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सामान्य निरीक्षक, उच्च निरीक्षक आणि स्थानिक नोडल अधिकाऱ्यांनी अधिक जागरूकतेने कार्य केले पाहिजे.
गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांमध्ये निवडणूक नियमांबाबत जागरुकता निर्माण करावी. फक्त घरोघरी जाऊन प्रचार करण्यास अनुमती दिली जावी. तसेच प्रचारादरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवावे. निवडणूक प्रक्रियेसाठी नेमलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या अधिकाराचा पूर्ण वापर करून निवडणूक मुक्त वातावरणात, न्यायसंयुक्त पार पाडावी, असा सल्ला निवडणूक आयुक्तांनी दिला.
निवडणूक प्रचारासंदर्भात आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे योग्यरित्या पालन झाले पाहिजे. प्रचारासंदर्भातील मार्गदर्शक सूचीचे पालन केले जाईल याकडे पोलिस खात्याने लक्ष द्यावे. निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणतीही कमतरता दोष राहणार नाहीत याची दक्षता घेतली जावी, जर कांही कमतरता दोष असेल तर तात्काळ दूर केले जावेत. अबकारी विभागानेही सतर्क राहून आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी असे सांगून निवडणुकीदरम्यान कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे कशा पद्धतीने काटेकोर पालन केले जावे, याबाबत आयुक्त डॉ. बी. बसवराजू यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बेळगाव महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व ती सिद्धता करण्यात आली असल्याचे सांगून त्या संबंधीची सविस्तर माहिती दिली.
पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन यांनी महापालिका निवडणुकीसाठी ठेवण्यात आलेल्या आणि येणाऱ्या पोलीस बंदोबस्तासंदर्भात माहिती दिली. बैठकीस नोडल अधिकारी बी. के. गौरीशंकर, मोहन शिवण्णावर, एन. व्ही. शिरगांवकर, मतमोजणी केंद्राच्या नोडल अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर आदींसह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि निवडणुकीशी संबंधित विविध अधिकारी उपस्थित होते.