स्वदेशी गोमाता संरक्षण, संवर्धन आणि गौ आधारित रोजगार निर्माण हे उद्देश्य घेऊन कौजलगी येथे बनशंकरी गौ अनुसंधान केंद्र कार्यरत असून या केंद्रामार्फत आता गोमयापासून राखी निर्मिती केली जात आहे.
गोमयापासून विविध वस्तू निर्माणांतर्गत बनशंकरी गौ अनुसंधान केंद्रतर्फे गोमय राखी तयार करण्यात आल्या आहेत. गोसंरक्षण, गोसंवर्धन हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. त्या अंतर्गतच हा हा आपला छोटासा प्रयत्न असल्याचे बनशंकरी गौ अनुसंधान केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही केवळ गोमय राखीच नव्हे, तर तो संकल्पही आहे. गोसेवेचा, गोमातेप्रति आदर दर्शविण्यासाठी गोमय राखी ही केवळ राखीच नव्हे तर हे गासूत्रबंधन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कौजलगी येथे केशवस्मृती ट्रस्ट व सावयव कृषी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बनशंकरी गोसंवर्धन व अनुसंधान केंद्र हा ‘गोमय राखी’ प्रकल्प साकारला जात आहे. एकात्मिक जैविक शेती, गोमयापासून विविध वस्तू निर्माण, पंचगव्य आणि आयुर्वेद, अपारंपारिक उर्जास्रोत विकास, स्वदेशी गोवंश संवर्धन आणि संरक्षण ही पंचसूत्री हा प्रकल्पाचा उद्देश आहे. या अंतर्गतच गोमयापासून राखी निर्मिती केली जात आहे.
त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पुण्यकर्मात नागरिकांचे मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे. ‘वीरवाणी’ कार्यालय तसेच किशोर निखार्गे (मो.8618814976) येथे या राख्या विक्रीस उपलब्ध आहेत, असे कळविण्यात आले आहे.