कोरोना मार्गदर्शक सुचीसह प्रशासनाच्या सर्व अटी -नियमांचे पालन करून आम्ही सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा करण्यास तयार आहोत, मात्र शहरातील ज्या परिसरात मंदिर, सभागृह आदींची सोय नाही, अशा ठिकाणच्या सार्व. गणेशोत्सव मंडळांना दहा बाय दहाचा मंडप उभारण्यास परवानगी दिली जावी, ही आपली मागणी लावून धरताना मध्यवर्ती या श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने आज तशा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन यांना सादर केले.
बेळगाव महापालिका निवडणुकीनंतर येत्या 10 ते 19 सप्टेंबर या कालावधीत यंदा 10 दिवस साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण -पाटील आणि कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवारी सकाळी पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन यांची भेट घेऊन त्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर आपल्या समस्या मांडल्या. बेळगाव शहरात 378 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या सर्वच मंडळांना मंडप घालण्यात परवानगी द्यावी अशी आमची मागणी नाही, मात्र ज्या ठिकाणी मंदिरे, समुदाय भवन, व्यायामशाळा आदी पर्यायी जागेची सोय नाही अशा सुमारे 75 ठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना किमान दहा बाय दहा आकाराचा गणेश मंडप घालण्यास परवानगी दिली जावी.
जेणेकरून सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजाच्या करता येईल. बाकी आमची कोणतीही मागणी नाही. सार्वजनिक श्री मूर्तीची दहा दिवस व्यवस्थित पूजा-अर्चा व्हावी हीच आमची इच्छा आहे. सरकारच्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीसह प्रशासनाच्या सर्व अटीनियमांचे आम्ही पालन करण्यास तयार आहोत. मात्र संबंधित 75 मंडळांना मंडप उभारणीस परवानगी द्यावी, अशी विनंती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
मंडप उभारणीच्या परवानगीबरोबरच कोरोना प्रादुर्भावाचा संपुष्टात आल्यानंतर भविष्यात परंपरेनुसार पुर्वापार जागेवर पूर्वीप्रमाणे मंडप उभारून श्री गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परवानगी दिली जावी अशी प्रमुख मागणीही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आणि तसे आगाऊ लेखी हमीपत्र देखील त्यांच्याकडून घेतले.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त डाॅ. त्यागराजन यांनी मध्यवर्तीय श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंडपासंदर्भात केलेल्या मागणीचा साकल्याने विचार करून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले. मात्र सर्व गणेशोत्सव मंडळाने कोरोना संदर्भातील सरकारच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करून आम्हाला सहकार्य केले पाहिजे. कारण निवडणूक 3 तारखेला संपल्यानंतर लगेच कांही दिवसात गणेशोत्सव आहे. त्यामुळे पोलिस खात्यावर मोठा ताण आहे.
तेंव्हा मागील वर्षाप्रमाणे पोलीस खात्याला सहकार्य करावे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही वर्तविण्यात आला आहे. तेव्हा आपण सर्वांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून गणेशोत्सव चांगल्याप्रकारे व्यवस्थित पार पाडूया. तुमच्या मागणीसंदर्भात मी नक्की जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेन. कारण शेवटी ते आदेश काढतात आणि त्या आदेशाची अंमलबजावणी आम्हाला करावी लागते. त्यामुळे मंडपावरून तुमच्या -आमच्यामध्ये संघर्ष व्हायला नको अशी माझी इच्छा आहे. तेंव्हा साकल्याने विचार करून गणेश मंडपांना कायद्याच्या चौकटीत परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.
यावेळी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप आवश्यक असणाऱ्या मंडळांची नावांची यादी देण्याची तयारी देखील दर्शविली. पोलीस आयुक्तांची भेट घेणाऱ्या मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळांच्या शिष्टमंडळात चव्हाण -पाटील व कोंडुसकर यांच्यासह उपाध्यक्ष सतीश गौरगोंडा, सरचिटणीस शिवराज पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि दत्ता जाधव यांचा समावेश होता.