Wednesday, November 20, 2024

/

शहरातील गणेशोत्सव मंडळांची 10 रोजी व्यापक बैठक

 belgaum

आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमावलीबाबत विचार विनिमय करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासंदर्भात येत्या मंगळवार दि. 10 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक बोलावून अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे.

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिका-यांच्या आज मंगळवारी झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. सिद्धजोगेश्वर मंदिर ( शनिमंदिर जवळ ) येथे आज सायंकाळी झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील हे होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सरचिटणीस शिवराज पाटील यांनी केले.

बैठकीत गणेशोत्सवाचे आयोजन आणि प्रशासनाने जाहीर केलेले नियमावलीवर चर्चा करण्यात आली. तसे त्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना कशाप्रकारचे निवेदन द्यावयाचे यासंदर्भातील चर्चेअंती प्रशासनाच्या नियमावलीत थोडे बदल सुचविण्याची विनंती करण्याचा निर्णय येत्या मंगळवारी शहरातील सर्व महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक बोलावून त्यामध्ये घेण्याचे ठरले.

प्रशासनाच्या नियमावलीत सार्वजनिक ठिकाणी श्री गणेश मूर्ती न बसवता मंदिर किंवा मठामध्ये असण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात मंदिर अथवा मठ नाहीत अशा मंडळांना दहा बाय दहाचा मंडप उभारण्यास परवानगी दिली जावी. यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास निर्बंध असल्यामुळे गणेशोत्सवावर ज्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते अशा मूर्तिकार, मंडप डेकोरेटर्स, इलेक्ट्रिशियन आदी लोकांना सरकारने आर्थिक मदत करावी.

श्री मूर्तीचे आगमन आणि विसर्जनाप्रसंगी मर्यादित लोकांची जी अट घालण्यात आली आहे ती शिथील केली जावी आदी मागण्या निवेदनात नमूद करण्याचे बैठकीत ठरले. बैठकीस प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, सागर पाटील, मदन बामणे, शुभम शेळके, महादेव पाटील, सतीश गोरगोंडा, आदी सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.