बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत शहापूर आणि परिसरातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करण्याद्वारे बहुमताने निवडून आणून महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार कोरे गल्ली येथील पंच मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. तसेच प्रथम घरावर भगवा फडकवून मगच मतदानाला जाण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
कोरे गल्ली शहापूर येथील गंगापूरी मठ येथे आयोजित सदर बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
महापालिकेतील महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी आणि अन्यायाचा वचपा काढण्यासाठी संपूर्ण सीमाभागासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मराठी भाषिक उमेदवारांना विजयी होतील या दृष्टीने प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महानगरपालिकेची ही निवडणूक मराठी भाषिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असून सीमाभागात भगवं वादळ उठवण्याची हीच ती वेळ असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. तसेच कोरे गल्लीतील युवकांनी घरावर भगवा फ़डकऊनच मतदानाला बाहेर पडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
बेळगाव महापालिकेची निवडणूक तब्बल आठ वर्षांनी होऊ घातली असून मराठी भाषिकांना विकासाचे गाजर दाखऊन सत्तेपासून दूर ठेवण्याचा कुटील डाव विरोधकांनी आखला आहे.
हा डाव हाणून पाडण्यासाठी म. ए. समितीच्या सर्व जागा निवडून आणण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीचे सूत्रसंचालन सुधीर नेसरीकर यांनी केले. बैठकीस अभिजीत मजुकर, यश हंडे, महेश मजुकर, गोकुळ पाटील, राकेश सावंत, प्रवीण शहापूरकर आदींसह गल्लीतील पंच मंडळी, प्रतिष्ठित नागरिक आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.