बेळगाव महापालिका निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणतीही उणीव अथवा दोष राहता कामा नये, असा सक्त इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या -2021 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज सोमवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली.
त्यावेळी ते बोलत होते. मतदान यंत्र हाताळणी, मतदार यादी तपासणी आणि मत पत्रिकेसंदर्भात निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे.
तेंव्हा या प्रशिक्षणादरम्यान कोणालाही काही शंका अथवा समस्या असेल तर त्यांनी त्याचे तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निरसन करून घ्यावे. थोडक्यात निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होता कामा नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीसाठी शहरातील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल, सेंट पॉल हायस्कूल आणि सेंट मेरीज हायस्कूल या ठिकाणी निवडणूक प्रशिक्षण केंद्रे स्थापण्यात आली आहेत.
या सर्व केंद्रांना आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.