बेळगाव महापालिका निवडणुकीला राजकीय रंग जोर धरत असून रविवारी सकाळी अझमनगर सर्कलनजीक याची प्रचिती आली, जेंव्हा दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांनी एकमेकांवर खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी अझमनगर क्र. 34 मधून काँग्रेसकडून इजाज खान उभे असून त्यांचे प्रतिस्पर्धी इम्रान खान हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
अझमनगर सर्कलजवळ इम्रान यांचे कार्यालय आहे. काँग्रेस उमेदवार इजाज खान यांचे समर्थक असलेले समनअहमद नकार्शी व त्यांचा मित्र प्रशांत जांगळे हे दोघे जण तेथे शहाळे पीत उभे होते. त्यावेळी इम्रान खानचे समर्थकांनी तेथे येऊन तुम्ही आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या असे म्हणत भांडण काढले. या भांडणाचे पर्यवसान समनअहमद व प्रशांत जांगळे यांना लोखंडी रॉड, दगड व हाताने मारहाण करण्यामध्ये झाल्याची फिर्याद समान अहमद यांनी एपीएमसी पोलिसात दिली आहे.
त्यानुसार सलीम मुल्ला याच्यासह सहाजणांविरुध्द गुन्हा केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे इजाज खान यांचा समर्थक आरिफ याने समनअहमद याच्यासह पाच जणांविरुद्ध कुणी हल्ल्याची तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी हा गुन्हा देखील दाखल करून घेतला आहे.