बेळगाव महानगरपालिका निवडणुक जाहीर झाली असली तरी हा निर्णय अत्यंत घाईगडबडीचा आहे. तेंव्हा प्रशासनाने तात्काळ याचा खुलासा करावा किंवा निवडणूक जुन्या का नव्या आरक्षण आणि वाॅर्ड रचनेच्या आधारावर घेणार? हे तात्काळ जाहीर करावे, असे स्पष्ट मत माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष व माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी व्यक्त केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीसंदर्भात ‘बेळगाव लाईव्ह’कडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड. सातेरी बोलत होते. महापालिकेची निवडणूक जाहीर झाली ही चांगली गोष्ट आहे. मराठी माणसांनी आपले प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून लोकसभा निवडणूक जशी एकजूट राखून लढविली, तशाच पद्धतीने महापालिका निवडणूक लढवावी. भावी नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या उत्साही लोकांनी आपल्या उत्साहाला मुरड घालून प्रत्येक वार्डात एकच उमेदवार द्यावा, असे माजी महापौर सातेरी म्हणाले.
ज्यावेळी निवडणूक आयुक्तांनी निवडणूक जाहीर केली आहे, याचा अर्थ निवडणूक निश्चितपणे होणार आहे. उच्च न्यायालयाच्या बेंगलोर येथील मुख्य न्यायाधीशांकडून सरकारला सदर निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेच्या बाबतीत धारवाड खंडपीठासमोर सदोष वॉर्ड रचनेसंदर्भात एक याचिका दाखल आहे. मात्र आता निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे कोरोना वगैरे सारखे एखादी भयंकर संकट आल्याखेरीज निवडणूक पुढे ढकलली जाणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
एक मात्र खरे ही निवडणूक जाहीर झाल्यामुळे आरक्षण आणि वॉर्ड रचनेचा संभ्रम कायम राहणार आहे. निवडणूक आयोग जुन्या वार्ड आणि आरक्षणा प्रमाणे निवडणूक घेणार की मध्यंतरी जाहीर केलेल्या वार्ड पुनर्रचना आणि आरक्षणा प्रमाणे ही निवडणूक घेणार? हा संभ्रम प्रशासनाने दूर केला पाहिजे. एकंदरच निवडणुकीचा हा निर्णय अत्यंत घाईगडबडीचा आहे. तेंव्हा प्रशासनाने निवडणूक कोणत्या आरक्षण प्रमाणे आणि वॉर्ड रचनेप्रमाणे होणार हे तात्काळ स्पष्ट केले पाहिजे, असे स्पष्ट मत माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी व्यक्त केले.