राज्यातील अद्याप बंद असलेले इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे ऑफलाइन वर्ग पुनश्च सुरू करण्यासंदर्भात येत्या सोमवार दि. 30 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.
हुबळी विमानतळावर काल गुरुवारी आगमन झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिक्षणमंत्री नागेश म्हणाले की, सध्या नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. उच्च पातळीवरील तज्ञांच्या समितीचे सदस्य डाॅ. देवीशेट्टी यांनी सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.
त्याचप्रमाणे सध्या सुरू करण्यात आलेल्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा उत्तम प्रतिसाद पाहता सर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. तथापि तज्ज्ञ समितीच्या अहवालाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्ष -दीड वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना पुन्हा शिक्षण देण्याच्या उद्देशाने पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा शिक्षण खाते विचार करीत आहे. बाल तज्ञ व शिक्षण तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्या आधारे शाळातून कोविड मार्गदर्शक सूचीचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू करण्यात येतील.
यातूनही जर कोरोनाची तिसरी लाट आल्यास पुढे शाळा पुन्हा बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगून जास्तीत जास्त शिक्षकांना अनुकूल होईल या दृष्टीने शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत आहेत. येत्या 5 सप्टेंबरपासून कौन्सिलिंग प्रक्रिया सुरू होणार आहे. या संबंधात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील असेही शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.